कारंजा(Washim):- पानी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत फार्मर कप स्पर्धा राबविली जात आहे. यासाठी कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून, कारंजा तालुक्यातील विविध गावातील शेतकरी गट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्या अनुषंगाने धानोरा ताथोड येथील श्री संत गजानन महाराज शेतकरी गटाने यंदा गटाची पुनर्बांधणी करून पुन्हा स्पर्धेत उतरत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या शेतकरी गटाने एका दिवसात तब्बल 4 हजार लिटर दशपर्णी अर्क(Dasparni extract) तयार केला.
कृषी विभागाकडून गटातील सदस्यांचे कौतुक
पिकावरील मित्र किडीचे संरक्षण करत, शत्रु किडीला नियंत्रणात ठेवण्याकरिता फवारणीसाठी रासायनिक औषधाला (Chemical drugs) पर्याय म्हणून दशपर्णी अर्क वापरला जातो. गटातील सदस्यांनी एकत्र येऊन 200 लिटरच्या 20 टाक्या म्हणजे 4 हजार लिटर दशपर्णी अर्क एका दिवसात तयार केला. या अनोख्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी कारंजा तालुका कृषी अधिकारी(Agricultural Officer) रवींद्र जटाळे ,कृषी सहाय्यक फुके उपस्थित होते.
संत गजानन महाराज शेतकरी गटाद्वारे
गटाने केलेली कामगिरी व या दशपर्णी अर्काच्या महत्त्वा बद्दल जटाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एखाद्या गावातील शेतकरी गट एवढ्या मोठ्या प्रमाणात दशपर्णी अर्क तयार करतोय हि कौतुकाची गोष्ट असून, यामुळे कीटकनाशकांवर (Pesticides) होणारा शेतकऱ्यांचा प्रचंड खर्च वाचणार आहेच, शिवाय विषमुक्त अन्न उत्पादन करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. तर पुढे बोलताना आपल्या परिसरात दशपर्णी करीता लागणाऱ्या सर्व वनस्पती सहज उपलब्ध आहेत. गटाने एकमेकांना मदत करत सर्व झाडांची पाने जमा करून आज एवढया मोठ्या प्रमाणात दशपर्णी अर्क बनविला, त्याबद्दल जटाळे यांनी गटातील सदस्यांचे कौतुक केले. शिवाय त्यांनी दशपर्णी अर्क बनवण्याच्या या प्रक्रियेमध्ये स्वतः भाग घेत गटाचा उत्साह वाढवला. गटाच्या सदस्यांनी सुद्धा हा विषय फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता गावातील इतर शेतकरी, गावातील महिला शेतकरी (Farmer) तसेच गावाला लागून असलेल्या इतर गावातील शेतकऱ्यांना यासाठी आवर्जून आमंत्रित केले होते. यावेळी सुकळी, इंझा व यावर्डी या गावातील शेतकरी उपस्थित होते.