मनरेगाच्या विहिरीचे इस्टिमेट वाढविण्यासाठी 12 हजारांची स्वीकारली लाच!
लातूर (ACB Crime Case) : नवीन दरानुसार मनरेगाच्या योजनेतून मिळणाऱ्या विहिरीचे इस्टिमेट पाच लाखांचे करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांच्या आडनावात दुरुस्ती करण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच घेताना रेणापूर पंचायत समितीच्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रंगेहात अटक केली. दरम्यान या कारवाईने लातूर जिल्ह्यात मनरेगातून होत असलेल्या विविध योजनांमध्ये चालणाऱ्या लाचखोर प्रवृत्तींना हादरा बसला आहे.
याबाबत माहिती अशी की, ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले (वय 43 वर्षे, पद सहायक कार्यक्रम अधिकारी, (कंत्राटी ) नेमणूक पंचायत समिती कार्यालय, रेणापूर ता. रेणापूर जि. लातूर रा. ग्रॅव्हिटी शाळेजवळ, अग्रोया नगर, लातूर) यांनी 31 वर्षीय तक्रारदार यांच्या रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथील शेतीमध्ये मनरेगाच्या नवीन दरानुसार विहिरीचे इस्टिमेट पाच लाखाचे करण्याच्या कामासाठी तसेच नरेगा साईटवर तक्रारदाराच्या वडिलाचे आडनावांमध्ये सोमवंशी ऐवजी सूर्यवंशी चुकीचे नाव झालेले असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदारास पंधरा हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने 8 मे रोजी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातर जमा करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेणापूर पंचायत समितीत पडताळणी करून 14 मे, 16 मे व 19 मे रोजी सापळा लावला. मात्र तक्रारदार व आरोपीची या तिन्ही दिवशी भेट न झाल्याने सापळा यशस्वी होऊ शकला नाही.
20 मे रोजी तक्रारदार पंचायत समितीत गेल्यानंतर आरोपीने “आणला का रे पैसे” असे विचारले. त्यावर तक्रारदार “साहेब 15000 रुपये जास्त होतेत” असे म्हणाला. त्यावर आरोपी चिखले यांनी “तुझ्या मनाने देऊन जा” असे म्हणून लाच रक्कम स्वतः स्विकारण्यास सहमती दिली. दि.20/05/2025 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच रकम 12000 रुपये स्वतः स्विकारली. त्याचवेळी एसीबीने आरोपी ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले.
एसीबीकडून घराची झडती…
यावेळी आरोपी ज्योतिर्लिंग चिखले याची झडती घेतल्यानंतर स्वीकारलेली लाचेची रक्कम बारा हजार रुपये आणि एक मोबाईल फोन मिळून आला. आरोपी ज्योतिर्लिंग शिकले याचे निवासस्थान लातूर येथे असून या घराचेही एसीबीकडून झडती सुरू आहे. दरम्यान ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांच्याविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात कलम 7 अ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.