औसा (Latur):- औसा शहरातील सावली लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून दामिनी पथक व एएचटीयु पथकाने कारवाई करीत एका महिलेची सुटका केली. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.\ याप्रकरणी लॉज चालक व्यंकट गोरोबा जगताप याच्यासह औसा तालुक्यातील उतका येथील प्रवीण बालाजी कल्याणी (वय 22 वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉजवर (lodge) छापा पडताच लॉजचा चालक व्यंकट जगताप फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने लॉजवर छापा
औसा शहरात लॉज व हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) चालविला जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने निलंगा रोडवरील तुळजापूर टी पॉईंट येथील सावली लॉजवर बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने लॉजवर छापा टाकला. यात बाहेर गावाहून आणलेली एक महिला मिळून आली तर लॉज मॅनेजरला लॉजवरून ताब्यात घेण्यात आले असून वेश्या गमनासाठी आणलेल्या महिलेची सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे औशात खळबळ उडाली असून औसा शहरातही अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई दामिनी व एएचटीयु पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अमलदार लता गिरी, मीना पवार, मीरा सोळंके, सुजाता चिखलीकर यांनी केली. वेश्या व्यवसायाबाबत काही माहिती मिळाल्यास त्याबाबत एएचटीयु कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.