परभणीतील मोर्चात न्यायाची मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधीची प्रतिक्रिया
परभणी (Santosh Deshmukh Murder Case) : शहरातील नुतन महाविद्यालयाच्या मैनावरुन मोर्चाला सुरुवात झाली. शिस्तबध्द पध्दतीत मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दाखल झाला. या ठिकाणी सभा झाली.
आमच्या पाठीशी हात राहू द्या
वडिलांनी समाजसेवा केली. आमच्या कुटूंबाच्या पाठीशी शेवटपर्यत उभे राहा. आज जमलेल्या समुदायात वडिलांचा चेहरा दिसतोय. माझ्या जवळ बोलण्यासाठी शब्द नाहीत, आमच्या पाठीशी सदैव उभे राहा, अशी विनंती स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सभेत केली.
योग्य दोषारोपपत्र दाखल करा- खा. संजय जाधव
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात योग्य तपास करत व्यवस्थित चार्जशिट न्यायालयात दाखल करावी. पैशाच्या लालसेपोटी सामान्य नागरीकांचा खून होत आहे. शासनाने यात लक्ष देत साक्ष, पुराव्यांची नोंद घ्यावी, घटनेचा योग्य तपास करावा. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा. सर्व प्रकरणाची चौकशी निपक्षपाती पणे व्हावी.
देशमुख कुटूंबीयांना धक्का लागला तर रस्त्यावर फिरु देणार नाही- मनोज जरांगे
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) कुटूंबीयांना धमक्या देण्यात येत आहेत. यापुढे जर देशमुख कुटूंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही. त्रास झाला तर घरात घुसून हाणायचे. सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळायला लागलेत. समाजावर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल. यापुढील काळात जशाला तसे उत्तर दिले जाईल. देशमुख कुटूंबीय एकटे नसून सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे.
आरोपीवर मोक्का लागला पाहिजे – आ. सुरेश धस
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागला पाहिजे. आका आणि त्याचा आका व इतर आरोपींवर कारवाई व्हावी. हत्ये मागचा मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. शासनाकडे केलेल्या मागणीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
आरोपींना फाशी झाली पाहिजे – आ.डॉ. राहूल पाटील
सर्व सामान्य जनतेमध्ये आक्रोश आहे. राज्यभरात या घटनेचा निषेध होत आहे. आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. त्यामुळे शंका निर्माण होते. राज्यात होणार्या घटना रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येतील आरोपींना फाशी झालीच पाहिजे.
रेकॉर्ड काढा, सीडीआर तपासा – आ. संदीप क्षिरसागर
महाराष्ट्रात अशी घटना घडली नव्हती. वाल्मीक कराड आरोपी आहे. घटनेदरम्यानचे रेकॉर्ड काढून सीडीआर तपासा यात आणखी खुप जण आहेत. परळी पॅटर्न बंद करायचा आहे. आरोपी हे फिल्मी स्टाईल अटक होतात. घटने मागच्या मास्टरमाईंडला रुग्णालयात कोण कोण भेटले या सर्वांची तपासणी होणे गरजेचे आहे. प्रकरण चालू असे पर्यंत धनंजय मुंढे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मोर्चामध्ये आ. संदीप क्षिरसागर यांनी केली.
शासनाकडे विनंती करणार – आ. राजेश विटेकर
सरपंच देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याविषयी शासनाकडे विनंती करणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई सुरू राहिल.
आरोपींना पकडण्यासाठी विलंब – डॉ. ज्योतीताई मेटे
न्यायाची लढाई ही विधीमंडळ आणि रस्त्यावर एकाच वेळी सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी विलंब होत आहे. या मागील अदृश्य कडी जोडली गेली पाहिजे. आरोपींना जेरबंद करुन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल झाले पाहिजे, देशमुख कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे.
निकाल लागेपर्यंत शांत बसायचे नाही – नरेंद्र पाटील
मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. घटनेतील आरोपींवर कारवाई करत नेत्याचाही राजीनामा घ्या. या मागे खरा सुत्रधार धनंजय मुंडे आहे. गुंडाराज, विशिष्ठ नेत्यांची दादागिरी सुरू असून त्यांना घरी बसवायचे. या (Santosh Deshmukh) प्रकरणात निकाल लागे पर्यंत शांत बसायचे नाही.