लातूर (Latur):- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(Public Works Department) बोगस कामाचे पितळ अवघ्या दीड महिन्याच्या पावसाने उघडे पाडले रस्त्याचे काम करून दोन महिने होत नाही, तोच चिंचोलीराव ते आलमला हा रस्ता काही ठिकाणी खचला आहे. याशिवाय या रस्त्याच्या साईड पट्ट्या अद्यापही भरल्या गेल्या नाहीत.
नाल्यावरील पुलावरचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला
लातूर तालुक्यातील चिंचोलीराव ते औसा तालुक्यातील आलमला या गावादरम्यान आलमला शिवारात असलेल्या दोन किलोमीटर रस्त्याचे काम उन्हाळ्यामध्ये लातूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ३ च्या अंतर्गत करण्यात आले. हे काम करताना अत्यंत ढिसाळ पद्धतीने काम झाले. काम करताना व्यवस्थित दबई केली गेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. शिवाय कुडगु नाल्यावरील पुलावरचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यानंतर तात्पुरती मखलाशी करून तेथे रस्ता दुरुस्त केला. मात्र आता आलमला तांड्याकडे जाणाऱ्या पाटीजवळ हा रस्ता खचून गेला आहे.
काम करतानाच रस्त्याच्या साईडपट्ट्या भरणे आवश्यक होते
या रस्त्याचे काम होऊन दोन महिने उलटून गेले काम करणाऱ्या कंत्राटदाराला (contractor) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काम करतानाच रस्त्याच्या साईडपट्ट्या भरणे आवश्यक होते. मात्र त्या भरल्या गेल्या नाहीत. कंत्राटदाराला साईड पट्ट्या न भरण्यास मोकळीक दिल्याने साईड पट्ट्याच्या बाजूला रस्ता खचून मोठा धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या साईड पट्ट्या न भरल्याने संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांचा फायदा आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा तोटा होण्याचा संभव अधिक आहे.
काम अर्धवट राहिले आहे
याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता आवळे यांच्याशी चर्चा केली असता या रस्त्याचे काही काम अर्धवट राहिले आहे, असे ते म्हणाले. सध्या पावसामुळे खदानित पाणी साठल्याने मुरूम उपलब्ध होत नाही. पावसाळा संपल्यानंतर साईडपट्ट्यांचे काम व उर्वरित राहिलेले काम केले जाईल. आलमला तांडा पाटीजवळ खचलेला रस्ताही दुरुस्त करून घेऊ, असे ते ‘देशोन्नती’शी (Deshonnati)बोलताना म्हणाले.