Pusad :- शहर पोलीस स्टेशनच्या (Police station) हद्दीमध्ये शहर डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना २७ ऑक्टोंबर रोजी गोपनीय खबर्यामार्फत माहिती मिळाली की, शहरातील गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान एक इसम इनोव्हा कारमध्ये घातपात करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र बाळगून येत असल्याची माहिती मिळाली.
पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
घटनेचे गांभीर्य ओळखून डीबी पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरात सापळा रचून इनोव्हा चारचाकी वाहन क्रमांक एमएच -१२ इएम -०९७७ थांबवून चालक दिनेश देविदास खोडे (३८) रा. मांजरडा ता. जि. यवतमाळ यांची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये घुसून एक गावठी बनावटीची पिस्टल (देशी कट्टा) मॅक्झिनसह अंदाजे किंमत तीस हजार रुपये, इनोव्हा चारचाकी वाहन अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ३,२५ शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर डीबी पथक करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या सूचनेनुसार डीबी प्रमुख सपोनी प्रेम कुमार केदार, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर, प्रफुल इंगोले, मनोज कदम, शुधोधन भगत, सचिन राऊत भोला कानेड इत्यादींनी केली.
