पुसद (Pusad Municipal council) : नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या व सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असलेल्या शहरातील रस्त्यांवर व मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरी व रेती पडलेली असल्यामुळे, यावर दुचाकी घसरून अनेकांचा अपघात झाल्याच्या घटना सतत शहरात घडत आहेत.
महात्मा फुले चौकामध्ये नाईक चौकाकडून येणाऱ्या दोन वेगवेगळ्या दुचाकी वर येत असलेल्या महिला कारला रोड कडे टर्न करीत असताना महात्मा फुले चौकामध्ये या चुरीवरून गाडी स्लीप होऊन त्या ठिकाणी कोसळल्या. नागरिकांसह दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी ही त्या ठिकाणी उपस्थित होते. तातडीने त्या महिलांना त्या ठिकाणी उचलून पुढे सुखरूप त्यांना रवाना केले या दोन्ही महिला बिचाऱ्या किरकोळ जखमी झाल्या होत्या.
या संदर्भात दैनिक देशोन्नतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कु. प्रिया पुजारी मॅडम व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश झळके यांना या संदर्भात सूचित केले होते. तर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्यअधिकारी अभिजीत वायकोस यांनाही या संदर्भात अवगत केले होते. प्रशासनाने तातडीने या गंभीर बाबीची दखल घेत 11 डिसेंबर रोजी दोन्ही विभागाच्या प्रशासनाने कर्मचारी रस्त्यावर उतरविले तर नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या पद्धतीने रस्त्यावरील चुरी व रेती अशी साफ केली. यामुळे किमान नागरिकांच्या गाड्या स्लिप होऊन अपघात होणार नाही हे विशेष.