पंकज अतुलकर उपविभागीय पोलीस अधिकारी
पुसद (Pusad Police) : शहर पोलीस स्टेशनच्या सभागृहामध्ये दि. 30 ऑगस्ट रोजी (Pusad Police) पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन केले होते. विशेष करून छत्रपती शिवाजी वॉर्ड मधील असंख्य महिला पुरुष व नागरिकांना या बैठकी करिता निमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांना मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हापोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी येणाऱ्या सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता सर्व नागरिकांनी अत्यंत संयमाने व शांतीचे वर्तन ठेवणे अपेक्षित असल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी वार्डात एका विशिष्ट जागेवर वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक विकास फंडाच्या माध्यमातून वॉल कंपाऊंड चे काम करण्यात आले. या ठिकाणी महादेवाची पिंड तर बौद्ध धर्मियांचे पंचशील ध्वज होता. मात्र संबंधित जागेचा ताबा आम्हालाच मिळावा या आकस पूर्ण मागणी करिता दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन सातत्याने भांडण तंटे होत होते.
प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सदर ठिकाणी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, नायब तहसीलदार इंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या उपस्थितीत सील ठोकून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सदर प्रकरण सुरू आहे. मात्र तरीही या ठिकाणी वाद होऊन भांडण तंटे होत आहेत. ते होऊ नये याकरिता आज शांतता कमिटीची मीटिंग बोलवण्यात आली होती. यावेळी एका महिलेने आपली आप बीती (Pusad Police) उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या समक्ष कथन केली. तर किरण आत्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या सर्वांना मार्गदर्शन करताना अतुलकर म्हणाले की, आपल्या पाल्यांना अत्यंत योग्य संस्कार फक्त आणि फक्त आई देऊ शकते. रात्री अपरात्री आपल्या पाल्यांना बाहेर फिरू न देणे, वादविवाद न करणे, व रात्री शांतपणे आपल्या घरी लवकर झोपी जाणे असे संस्कार जर आईने आपल्या पाल्यांना केले तर असे कुठलेच विषय घडू शकत नाहीत याची ठामपणे खात्री व्यक्त केली. येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्व नागरिकांनी आपसामध्ये बंधू भाऊ एकता कायम ठेवून कायदा व सुव्यवस्था बाबतीत राहील याकरिता सहकार्य करणे अपेक्षित आहे. तर सदरील प्रकरण हे वरिष्ठांपर्यंत पोहोचले असून लवकरच निकाली निघेल असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी (Pusad Police) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे, गोपनीय विभागाचे नितेश भालेराव, एटीएसचे जाधव जलाल शेख अभिनव चव्हाण इत्यादी अधिकाऱ्यांसह किरण आत्राम, पुंडलिक धावस, मनोज गजभार, सरिता जोगदंडे, दिनेश पोटे, कृष्णा बंदुके, बबलू उतळे, राजू यादव, संजय माटे, नंदा सुभाष पाध्ये, मंगल गोविंद पाध्ये, सुरज मुळे, राजू जगताप, मयूर पाद्ये, शंतनू पाद्ये, मनोज बोराळ, गजू जगताप, विजया पवार, सुनील आत्राम, विजय शर्मा इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते .