पुसद (Pusad Suicide Case) : वसंतनगर पोलीस स्टेशन (Vasantnagar Police) अंतर्गत येत असलेल्या पुसदच्या गांधीनगरात दि.14 जूनच्या सायंकाळी सहा वाजता दरम्यान एका इसमाने राहत्या घराच्या सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन रामचंद्र अंभोरे वय 30 वर्ष रा. मुळावा ता. उमरखेड हल्ली मुक्काम गांधीनगर पुसद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझी सख्खी बहीण सौं हर्षा अनिल अगस्ती ही कंत्राटी कर्मचारी म्हणून पंचायत समिती पुसद येथे कार्यरत आहे. तर तिचे पती अनिल अगस्ती हे दिग्रस येथील वैनगंगा अर्बन बँकेत खाजगी नोकरी करीत होते. ते पुसद येथे शुभम कव्हाने यांच्या गांधीनगर येथील घरात भाड्याने राहत होते.
दि. 14 जून रोजी च्या सायंकाळी 6 वाजता दरम्यान माझ्या बहिणीचा मला फोन आला की, तिचे पती अनिल अगस्ती घरात असून ते दरवाजा उघडत नाहीत. आतून दार बंद आहे. त्यांना आवाज दिला तर ते बोलत सुद्धा नाहीत. मी तातडीने माझ्या बहिणीच्या घरी आलो. मी व घरमालक शुभम कव्हाणे दार लोटून तोडले. आत बघितले असता हॉलमधील सिलिंग फॅनला माझ्या बहिणीच्या पतीने ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. बघितले असता ते मृत झाल्याचे दिसले. माझ्या बहिणीने सांगितले की, सकाळी 9 वाजता ती ड्युटी करिता पंचायत समितीला गेली होती. त्यावेळी तिचे पती घरी नव्हते.
सायंकाळी ड्युटी वरून परत आल्यानंतर सदरची घटना उघड झाली. घटनेची माहिती मिळताच वसंतनगर पोलीस (Vasantnagar Police) ठाण्याचे बीट जमदार सुदाम आडे व त्यांचे सहाय्यक कॉन्स्टेबल रवी जाधव यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण शासकीय रुग्णालयात पीएम करिता पाठविला. फिर्यादी यांच्या या आशयाचे फिर्यादीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार सुदाम आडे व रवी जाधव करीत आहेत. सदर (Suicide Case) आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.