पुसद (Pusad Tehsil Revenue) : सध्या सर्वत्र आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामुळे सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी हे कर्तव्यामध्ये व्यस्त आहेत. याच संधीचा फायदा उचलून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे योग्य रीतीने पालन व्हावे याकरिता महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडवर आलेले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय बांधकामे सुरू आहेत.
या (Pusad Tehsil Revenue) बांधकामांना मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्यांची आवश्यकता पडत आहे. रेती मुरूम गिट्टी हा बांधकामामधील महत्त्वाचा भाग बांधकाम बाजारपेठेमध्ये मागणी वाढल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नदी नाल्यातून डोंगरदर्यातून अवैधपणे गौण खनिज उत्खनन व वाहतूक केला जात आहे. काही व्यवसायिक शासकीय रॉयल्टी ऑनलाईन काढून आपला व्यवसाय करीत आहेत तर अनेक व्यावसायिक चोरट्या मार्गाने शासनाचा महसूल बुडवून व्यवसाय करीत असल्याची बाब पुसद तहसील प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अवैधपणे गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसुली कारवाईचा धडाका सुरू केला आहे. उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्यासह नायब तहसीलदार विवेक इंगोले निवासी नायब तहसीलदार गजानन कदम व इत्यादी सदर कारवाई करीत आहेत.