परभणी (Parbhani):- इमारत व इतर बांधकाम कामगार (Construction workers) कल्याणकारी मंडळ अंतर्गत सरकारी कामगार कार्यालयाच्या वतीने बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच वाटप करण्यात येत आहे. नांदखेडा रस्त्यावरील वितरण कार्यालयात कामगारांच्या रांगाच रांगा लागल्यामुळे भांडे वितरणाचा बोजवारा उडाला आहे.
वितरण केंद्र वाढविण्याची मागणी
संसारोपयोगी भांडे वितरण केंद्र नांदखेडा रोड येथील केंद्रावर बांधकाम कामगारांनी एकच गर्दी (Crowd) केल्यामुळे येथे हजारो बांधकाम कामगार उन – पावसाची पर्वा न करता दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत देखील रांगेत उभे राहावे लागत आहे. बाहेर गावावरून येणार्या बांधकाम कामगारांची मात्र चांगलीच अडचण होत आहे. दुरच्या गावातील अनेक बांधकाम कामगारांना वितरण केंद्र परिसरात रस्त्यावरच मुक्काम करावा लागत आहे.
वितरण व्यवस्था सुरळीत करा
शहरातील नांदखेडा रस्ता परिसरात सरकारी कामगार कार्यालयाचे वितरण केंद्र आहे. तेथे संसारोपयोगी भांडे संचासाठी हजारो बांधकाम कामगार दररोज रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे ऐनखरीप हंगामाच्या आणि बांधकामाच्या दिवसांत कामगारांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे सरकारी कामगार कार्यालयाने संसारोपयोगी भांडे संच वितरणाची व्यवस्था सुरळीत करून वितरण केंद्र वाढविण्याची गरज असल्याचे गर्दीवरून दिसून येत आहे. या वितरण केंद्रावर अनेक बांधकाम कामगार पावसाळ्याचे दिसव असुनही दिवसभर रांगेत उभे राहूनही नंबर न आल्यामुळे रात्रीचा मुक्काम येथेच रस्त्यावर करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने बांधकाम कामगारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे सरकारी कामगार कार्यालयाने संसारोपयोगी भांडे संच वितरणाची व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी बांधकाम कामगारांतून होत आहे.