परभणीच्या गंगाखेड मधील उड्डाणपुल कृती समितीची मागणी
परभणी/गंगाखेड (Railway flyover) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील अकोली रेल्वे फाटकावरील मंजूर उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरु करावे, अशी मागणी (Railway flyover) उड्डाणपुल कृती समितीच्या वतीने तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
गंगाखेड शहराचे वाढते विस्तारीकरण तसेच कोद्री रस्त्यावरील ग्रामीण भागाचा ७० टक्के भाग अकोली रेल्वे फाटकावरील मार्गावर असुन सर्व प्रशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय सुद्धा याच परिसरात असल्यामुळे अकोली रेल्वे फाटकावरून ये जा करतांना सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना रहदारी करणे जीव घेणे झाले असल्याचे निवेदनात नमूद करून अकोली (Railway flyover) रेल्वे फाटक वारंवार लागत असल्यामुळे तासोंतास वाहतूक खोळंबा होऊन रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याने अकोली रेल्वे फाटकावर मंजूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन शहरातील प्राचार्य, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह उड्डाणपुल कृती समितीचे सदस्य बालाजी मुंडे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शंकर वाघमारे, दिगंबर घोबाळे, प्रा. मारुती साळवे, प्राचार्य बजरंग धूत, प्राचार्य बालाजी ढाकणे, लक्ष्मण लटपटे, विश्वनाथ बिडगर, गोविंद लटपटे, प्रा. अमोल ढाकणे, बंडू ओझा, संदीप राठोड, प्रा. गोविंद चोरघडे, संभूदेव मुंडे, अँड. राजू देशमुख, प्रताप मुंडे, भगीरथ फड, राजाभाऊ फड, मनोज मुरकुटे, मनोहर वावळे, सुमित कामत, निवृत्ती भेंडेकर, गणेश राठोड, श्रीमंत नागरगोजे, सुधाकर कुसळे, मुंजाराम मुंडे, भरत भेंडेकर, प्रतापसिंह ठाकुर, संभाजी वाडेवाले, अशोकराव मुंडे, पांडुरंग लटपटे, रमेश खांडेकर, विश्वनाथ सोन्नर, अशोकराव मुरकुटे, रामकिशन मुंडे, वैजनाथ कांबळे, रावसाहेब गुट्टे आदींनी तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्याकडे सादर केले आहे.
रेल्वे रूळ निघणार तर उड्डाणपुल हवे कशाला?
गंगाखेड ते परळी दरम्यान (Railway flyover) रेल्वे रुळाचे दुहेरीकरण केले जाणार असल्याने व अकोली रेल्वे फाटक परिसरातील रूळ काढून अन्य ठिकाणावरून शहराबाहेरून टाकले जाणार असल्याने व यासाठी रेल्वे प्रशासनाने जागा हस्तांतरीत करण्याचे काम सुद्धा हाती घेतले असुन अकोली रेल्वे फाटकावरील रूळ लवकरच काढण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणात अकोली फाटकावर रेल्वे रूळ राहणार नाही हे माहित असतांना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी उड्डाणपुल कशासाठी बांधत आहे, असा सवाल शहरातील बहुसंख्य नागरिक व व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.