प्रवाशांजवळील दागिने, रोकड, मोबाईल केले लंपास!
परभणी (Railway Passengers) : रेल्वेचा प्रवास हा सोयीचा समजला जातो. मागील काही दिवसात रेल्वे प्रवासात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे प्रवाशांजवळील दागिने, रोख रक्कम, मोबाईल असे साहित्य लंपास करत आहेत. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यात आले आहेत.
लोहमार्ग पोलिसात नोंद!
तिरुपती – साईनगर या एक्सप्रेसने प्रवास करत असताना पसाला सुरेश बाबु यांच्या जवळील साहित्य चोरट्याने लंपास केले. झोपेचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाजवळील बॅग चोरली. या बॅगेत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम मिळून ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. पूर्णा रेल्वे स्थानकाहून गाडी निघाल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करत असताना मनोहर नरमाला यांच्या जवळील १ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना परभणी रेल्वे स्थानकावर घडली. तसेच मराठवाडा एक्सप्रेसने प्रवास करत असताना शेख मुजीबुर रहेमान यांच्या जवळील २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लंपास केला. सचिन वानखेडे यांच्या जवळील मोबाईलही काचिगुडा गाडीतून चोरीला गेला. ही घटना पूर्णा रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. रिना मनधनी या रामेश्वर एक्सप्रेसने प्रवास करत असताना पूर्णा ते परभणी दरम्यान त्यांच्या जवळील ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. पूर्णा – अकोला या रेल्वे प्रवास करत असताना पूर्णा येथून गाडी सुटल्यानंतर माधव मधेवाड यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोकड मिळून साडे सोळा हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. सदर घटनांमध्ये लोहमार्ग पोलिसात (Railway Police) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


