परभणी/सोनपेठ (Parbhani):- शहरांसह संपूर्ण तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीने (heavy rain)नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गावांचा संपर्क तुटला, नागरीकांच्या घरात पाणी शिरले, पुरात अडकले, पिकांचे नुकसान, नागरीकांचे जनजीवन विस्कळित झाले असून यांसह अन्य विविध घटना घडल्या आहेत. तालुका प्रशासनाने तातडीने लक्ष दिले आहे.
सोनपेठ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली
सोनपेठ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे.शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोनपेठ शहरातील वान नदीला पूर आल्याने सोनपेठ ते सोनखेड संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. सोनपेठ ते शेळगाव या मार्गावरील फाल्गुनी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे याही मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तालुक्यातील बोरणा नदी पुर आला असून सकाळपासून खडका ते भिसेगाव या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गंगाखेड ते सोनपेठ दिवसभर वाहतूक बंद होती. त्याचबरोबर खडका ते नैकोटा, शिर्शी ते शिरोरी, शेळगाव ते थडीउक्कडगाव, नैकोटा ते बोंदरगाव यांसह अन्य विविध मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.सलग दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे सर्वत्र शेतशिवारात पाणीच पाणी झाले असून पिके आडवी झाली आहे.कापुस, सोयाबीन तुर यांसह अन्य विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शासनाच्या वतीने तात्काळ ओल दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे,घराची पडझड झाली, पाणी शिरल्याने नुकसान झाले सर्व गोष्टींचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे.