मानोरा(Washim):- मृग नक्षत्रात पडलेल्या थोडा फार पावसाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र गेल्या चार – पाच दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटण्याच्या मार्गावर असुन यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीलाभेगा पडत
यंदा जून महिन्यात झालेल्या रिमझिम पावसाच्या भरोश्यावर मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचे महागडे खत(Fertilizer), बी – बियाणे खरेदी करून कपाशी लावगडीसह सोयाबीन(soybeans), तूर, उडीद, मूंग, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली. मृग नक्षत्राच्या(Mrig Nakshatra) सुरुवातीला साधारणपणे झालेल्या पावसामुळे सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके चांगल्या प्रकारे उगवली. मात्र काही शेतकऱ्यांनी पेरणीची वेळ जात असल्याने चांगल्या पावसाच्या आशेवर पेरणी केलेले बियाणे पावसाअभावी जमिनीत अडकून पडले आहे. आता सर्वच पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीलाभेगा पडत असुन नुकतेच अंकुरलेले पिक माना टाकत आहेत. तर चांगल्या प्रकारे वाढ झालेले पिक उन्हाच्या तीव्रतेने करपत आहे.
दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहणार
आता बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत असुन येत्या एक दोन दिवसात पाऊस न आल्यास अनेक शेतकऱ्यांची पेरणी उलटून त्याच्यावर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहणार आहे. आज रोजी सुध्दा थोड्या फार शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. जर पाऊस आणखी लांबला तर सर्व शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे(sowing) संकट ओढावले जाऊ शकते. पावसाने हजेरी लावावी यासाठी दररोज बळीराजा देवाकडे साकडे घालत आहे.