निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Raj Thackeray) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे रविवार आगामी सार्वत्रिक (Assembly election) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शहरातील गोरक्षण रोडस्थित शुभमंगल कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला तर जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली. तसेच या बैठकीत त्यांनी पक्ष संघटनेचा आढावासुध्दा घेतला.
पाचही विधानसभा मतदारसंघाची केली चाचपणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) हे प्रत्यक्ष मैदानात उतरून पदाधिकारी आणि निरीक्षकांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी चाचपणी करीत आहेत. मनसेच्या विदर्भ दौऱ्यानिमित्त विदर्भातील काही जागांवर मनसेचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ज्या विधानसभा जागांवर सक्षम आणि त्या भागात ताकद असलेला उमेदवार दौऱ्यानिमित्ताने राज ठाकरे घोषित करणार अशी माहिती पुढे आली आहे. विदर्भातील ६२ जागांपैकी किती विधानसभांवर उमेदवार राज ठाकरे घोषित करतात, हे आता या दौऱ्यानिमित्ताने पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Assembly election) विधानसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी अकोल्यात येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बुलडोझरच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. बँड पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांनी उल्हासात स्वागत केले. यापूर्वी मनसे स्थापनेच्या वर्षी राज ठाकरे अकोल्यात आले होते. आज अकोल्यात त्यांची ही दुसरी भेट होती, हे विशेष.
अमित ठाकरे यांचा दौऱ्यात सहभाग
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचेही अकोल्यात आगमन झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले. या कार्यक्रमास पक्ष निरीक्षक तथा सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, सहनिरीक्षक योगेश सावंत, अकोला मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, माजी नगरसेवक पंकज साबळे, अरविंद शुक्ला, सतीश फाले, शेखर पोटदुखे, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, ललित यावलकर, राकेश शर्मा, भूषण भिरड आदी उपस्थित होते.
मेळाव्यासाठी तरुणांची उपस्थिती
सध्या विदर्भ दौऱ्यावर असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दुपारी दोन वाजता अकोल्यात दाखल झाले. गोरक्षण मार्गावरील शुभमंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शेकडो तरुण उपस्थित होते. राज ठाकरे सभा मंचावर आले. राज ठाकरे यांनी सभागृहातील गर्दीसमोर बोलण्यास नकार दिला, त्यानंतर मनसेच्या बैठकीतून मुख्य पदाधिकारी सोडून इतरांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.