हिंगोली (Raj Thackeray) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे ८ व ९ ऑगस्टला हिंगोलीत येणार असल्याने त्याच्या तयारी निमित्ताने मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारावर चालणारा हा हिंगोली जिल्हा असून त्यांच्याच विचारातून घडलेले राज ठाकरे (Raj Thackeray) हे तब्बल हिंगोलीत १२ वर्षानंतर नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली शहरात ८ व ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येणार आहेत. त्या निमित्ताने ६ ऑगस्टला शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, मनसे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ बंडू कुटे, मनसेचे जिल्हा सचिव दिपकराव वडकुते, मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांची उपस्थिती होती.
यावेळी हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून ८ व ९ ऑगस्टला मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंगोलीत तब्बल १२ वर्षानंतर येत आहेत. विशेष म्हणजे जेव्हा राज्यात १९९६ मध्ये युतीची सत्ता आली होती त्यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जिल्हा निर्मितीपूर्वी परभणी जिल्ह्यातून स्वतंत्र हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्याचा शब्द पूर्ण केला. त्यामुळे हा जिल्हा बाळासाहेबांच्या विचारावर अधिक प्रेम करणारा आहे. तसेच त्यांचेच विचार राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या सर्वांपर्यंत पोहचवित आहेत. ८ ऑगस्टला ४ वाजता राज ठाकरे यांचे हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे.
९ ऑगस्टला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर पदाधिकार्यांची बैठक घेऊन आगामी निवडणूक निमित्ताने संवाद साधणार आहेत. त्यानंतर नर्सी नामदेव किंवा औंढा नागनाथाचे दर्शन घेऊन परभणीकडे प्रयाण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, आ.राजू पाटील, नितीन सरदेसाई हे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असतील, विधानसभा निवडणुकीत २५० उमेदवार स्वबळावर उभे करण्याच्या दृष्टीने मनसेने तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.