परभणी(Parbhani):- विधान परिषदेच्या ११ जागासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १२ उमेदवारी अर्ज आल्याने शुक्रवार १२ जुलै रोजी मतदान (voting) होऊन सायंकाळी निकाल जाहिर झाला. या निवडणूकीत माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर हे विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी परभणीच्या सभेत दिलेला शब्द पाळला. विटेकर यांच्या निवडीने जिल्ह्याला एक तरुण तडफदार आमदार मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष (cheers)साजरा केला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शब्द पाळला
परभणी लोकसभेच्या २०१९ निवडणूकीत राजेश विटेकर यांनी दुसर्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांचा फार थोड्या फरकाच्या मताने पराभव झाला होता. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर विटेकर हे अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन आणि सामाजिक प्रश्नावर काम सुरुच ठेवले होते. मात्र अजित पवार (Ajit Pawar)हे महायुतीत गेल्यानंतरही परभणीची जागा राष्ट्रवादीलाच सुटून विटेकरांना उमेदवारी मिळेल, असे निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी महायुतीने घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना परभणीच्या जाहिर सभेत उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यात विधान परिषदेवर राजेश विटेकर यांना संधी देण्यात येईल, असा शब्द दिला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सभेतही पंतप्रधानांनी विटेकरांच्या पाठीवर थाप दिली होती. त्यानंतर विटेकर यांनीही महायुतीचे उमेदवार जानकर यांचा प्रचार करुन मताधिक्य मिळवून दिले.
दरम्यान विधान परिषदेच्या ११ जागासाठी निवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी निकाल जाहिर होऊन राजेश विटेकर यांना २३ मते मिळाली. त्यांच्या विजयामुळे परभणी जिल्ह्याला राष्ट्रवादीकडून एक तरुण आमदार मिळाल्याने त्यांच्या विजयाचे स्वागत करण्यात येत आहे. विटेकर हे जि.प. अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे पाहता ते आता आगामी काळात जिल्ह्यातील विकास कामांना वेग मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.