एस. ए. इंपेरियल बारच्या मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
पोलिस तपासात उघड झाला प्रकार
नांदगावपेठ (Rajkumar Sundarani murder case) : नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रहाटगाव येथील एस.ए. इम्पेरियल बारमधील लॉजिंगमध्ये मद्य पार्टीनंतर झालेल्या राजकुमार सुंदरानी यांच्या खून प्रकरणात आता बारमालक व व्यवस्थापक अडचणीत आले आहेत. आरोपींचे ओळखपत्र न तपासताच खोली दिली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच रजिस्टरवर खोली दिल्याची नोंद न घेतल्याने नांदगावपेठ पोलिसांनी बारमालक व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१२ जुलै रोजी रात्री, आरोपी बंटी पवार (३०, रा. लोहार लाईन, विलासनगर) व शिवा फुलवाणी (४२, रा. रामपुरी कॅम्प) यांनी राजकुमार तहलराम सुंदरानी (५४, रा. साई मंदिराजवळ, रामपुरी कॅम्प) यांच्यासोबत एस.ए. इम्पेरियल बारच्या खोली क्रमांक १०२ मध्ये मद्यपान केले.यावेळी अन्य दोन मित्र रवी तेजानी व अजय मेटानी हे सुद्धा खोलीत होते.मध्यरात्री ३ वाजता बारबाहेर आल्यानंतर किरकोळ कारणावरून आरोपी बंटी पवार, शिवा फुलवानी व राजकुमार सुंदरानी या तिघांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले आणि आरोपी बंटी पवार व शिवा फुलवानी यांनी बारसमोरच राजकुमार सुंदरानी (Rajkumar Sundarani murder case) यांची हत्या केली. हत्या झाल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
ही घटना घडल्यानंतर पोलिस तपास सुरू झाला असता, बारमधील लॉजिंग रजिस्टरमध्ये आरोपींच्या नावाची तसेच खोली दिल्याची नोंद नव्हती, तसेच त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र हॉटेल च्या वतीने घेण्यात आले नव्हते, हे तपासात उघडकीस आले.बार व्यवस्थापनाच्या या निष्काळजीपणामुळे नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय धनराज देऊळकर यांच्या तक्रारीवरून बारमालक मुद्दतसर अली व व्यवस्थापक विजय पुरणलाल खत्री (दोघेही रा. अमरावती) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ सहकलम मदाका ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान फरार आरोपी बंटी पवार व शिवा फुलवाणी यांना राजस्थानमधील कोटा शहरातून सोमवारी अटक करण्यात आली. (murder case) दोन्ही आरोपींना १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून नांदगाव पेठ पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहे.




