पत्रकार परिषद ना. रामदासआठवले यांचे प्रतिपादन
परभणी (Ramdas Athawale) : जगातील सर्वोत्कृष्ठ घटना म्हणून भारतीय संविधान मानले जाते. देशाचे सरकार संविधानानुसार चालते.संपूर्ण देश संविधान मानतो. मात्र केंद्रातील सरकार संविधान बलणार, अशा अपप्रचार विरोधक करत आहेत. देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही, ज्यांना संविधान मान्य नाही, त्यांनी देश सोडून जावा, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री खा. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.
परभणीत १० डिसेंबर रोजी एका माथेफिरुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना केली होती. त्यानंतर शहरात दंगल उसळली. या पार्श्वभूमीवर ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवार १४ डिसेंबर रोजी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर सावली विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खा.आठवले बोलत होते. पुुढे बोलताना ते म्हणाले की, परभणी शहरात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना हिंसक प्रकार घडले. मात्र यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत कोम्बिंग ऑपरेशन केले. महिला, पुरुषावर लाठीमार केला. शालेय विद्यार्थ्यांवर सुध्दा गुन्हे दाखल केले आहेत.
या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. आरोपीची नार्कोटेस्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाकडे आपण ही मागणी लावुन धरणार असून संसदेतही या प्रकरणी आवाज उठविणार असल्याचे ना. आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. परभणीकरांनी कायदा हाती न घेता शांतता राखण्याचे आवाहनही खा.आठवले यांनी केले. या पत्रकार परिषदेला डॉ. सिध्दार्थ भालेराव, डि.एन. दाभाडे, डॉ. विजय भालेराव आदींची उपस्थिती होती.