Gadchiroli:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची भूमिका बजावत असून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण, अभिव्यक्ती क्षमता व विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलता यांना चालना देणारे उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे मत रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. नरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले. वनश्री महाविद्यालय कोरची येथील राष्ट्रीय सेवा योजना(National Service Scheme) विशेष शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तरुणांच्या अंगी जे तीन गुण असावेत अशी अपेक्षा दादा धर्माधिकारी यांनी व्यक्त केली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयदेव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोरची येथील प्राचार्य उमाकांत ढोक, श्री. कायंदे सर, लोकमत पत्रकार राहुल अंबादे, सामाजिक कार्यकर्ते इजामसाय काटेंगे, वनपरिक्षेत्राधिकारी राठोड साहेब, ग्रामपंचायत सदस्या देशिरबाई घाटघुमर, शुभद्रा करशी, महिला बचत गटाच्या सचिव देवबती सहाळा, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेदरामजी थाट व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद चहारे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, तरुणांच्या अंगी जे तीन गुण असावेत अशी अपेक्षा दादा धर्माधिकारी यांनी व्यक्त केली होती. त्यातील तपस्वीता हा गुण रासेयो स्वयंसेवकांमध्ये (Volunteers) विशेषत्वाने आढळतो. समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून देऊन सेवा करण्याचे संस्कार रासेयोमधूनच विद्यार्थ्यांवर केले जातात. या तपस्वीतेतूनच त्यांच्यामध्ये तत्परता आणि तेजस्वीता या गुणांचे बीजारोपण होते. या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य प्रकाशमय करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रेम साठवण्यासाठी आम्हाला पुरवणी म्हणून ओढणी घ्यावी लागली
सविस्तर वृत्त असे की, कोरची येथील वनश्री महाविद्यालयाचे ‘जलसंवर्धन व आरोग्यासाठी युवक’, या संकेल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर टेमली येथे आयोजित करण्यात आले. समारोपप्रसंगी शिबिरादरम्यान आलेले अनुभव सुशील नुरुटी, रुपेश दुधनांग, तेजस शाहू, करण घाटघुमर व स्वप्निल मडावी यांनी आपल्या मनोगतातून मांडले. यावेळी शिवारातील स्वयंसेवकांकडून गावकऱ्यांना मिळालेले प्रेम हे पदरात न मावणारे असल्याने ते प्रेम साठवण्यासाठी आम्हाला पुरवणी म्हणून ओढणी घ्यावी लागली, असे मत ग्रामपंचायत सदस्य देशिरबाई घाटघुमर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी बेदरामजी थाट, राहुल अंबादास, प्राचार्य उमाकांत ढोक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, नालीसफाई, बंधारा बांधकाम, आरोग्य शिबीर व कुटुंब सर्वेक्षण इत्यादी उपक्रम राबविले. तर रात्रो नकला, एकांकिका, नाटकादी सांस्कृतिक कार्यक्रमांतून ग्रामवसीयांचे प्रबोधन करण्यात आले.
समारोपिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल बोगा यांनी केले. प्रास्ताविक व अहवाल वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद चहारे यांनी तर आभार प्रदर्शन कु. पार्वती कल्लो हिने केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रदीप चापले, प्रा. शितल कोसे, श्री. विनायक शेंडे, श्री. प्रकाश मेश्राम, श्री. खुशाल मेश्राम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व रासेयो स्वयंसेवक व टेमली येथील समस्त ग्रामवासी यांनी मोलाचे सहकार्य केले.