हिंगोली (Rastraroko Andolan) : जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुळ आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी समाज बांधवांनी आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
हिंगोली -सेनगाव जिंतूर टी- पॉईंटवर रस्ता रोको आंदोलन
सेनगाव : मूळ आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच आदिवासी समाजाच्या प्रमुख विविध मागण्या संदर्भात ३० सप्टेंबर रोजी सेनगाव – हिंगोली – जिंतूर टी पॉईंट सेनगाव येथे आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ६ जुलै २०१७ रोजी च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बारा हजार पाचशे अधिसंख्य ठरलेल्या पदावरील बोगस आदिवासी कर्मचारी यांना तात्काळ सेवा मुक्त करून सदरील पदे व ५५ हजार ६८७ अनुशेषाची रिक्त पदे विशेष पदभरती मोहिमेद्वारे तात्काळ भरण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील वर्ग एक वर्ग दोन व वर्ग तीन ची पदे भरतेवेळी पूर्व परीक्षांच्या अर्जांमध्ये जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे, शासकीय सेवेतील पदभरतीत अनुसूचित जमातीतील संवर्गाच्या कोट्यातून निवड झालेल्या कर्मचार्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर नियुक्ती देण्यात येऊ नये, अनुसूचित जमातीच्या संवर्गाच्या सर्व पदांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती आरक्षण पूर्ववत सुरू करावे, टीआरटीआय पुणे या संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारूड यांच्यावर बोगस जातीच्या लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
ते मागे घेऊन त्यांना संरक्षण देण्यात यावे, अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मेगा भरतीत संधी द्यावी व तात्काळ मेगा भरती चालू करावी, अनुसूचित जमातीतील पीएचडी धारक विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून केंद्र शासनाच्या धर्तीवर फेलोशिप लागू करावी, जुलै २०१६ रोजी स्थापन करण्यात आलेली. विशेष तपासणी समिती (एस आय टी) महसूल विभाग छत्रपती संभाजी नगर मधील नामसाथ याचा फायदा घेऊन अनुसूचित जमातीची बोगस जात प्रमाणपत्र जात पडताळणी करून प्राप्त करणार्या एसआयटीचा अहवाल व शिफारशी लागू कराव्यात, शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील कला शिक्षक व क्रीडा शिक्षकांच्या नेमणुका तात्काळ करण्यात याव्यात, शबरी घरकुल योजनांच्या बांधकाम निधीमध्ये वाढ करून तीन लाख रुपये करण्यात यावा, अनुसूचित जमातीच्या एसटी संवर्गाच्या पदांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती व आरक्षण पूर्ववत सुरू करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. सदरील मागण्यांचे निवेदन सेनगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. या निवेदनावर संजय काळे,जनार्धन ठोंबरे, गजानन घुकसे, रामजी फुपाटे, दौलत चिभडे, शेषराव हगवणे, ज्ञानेश्वर धोत्रे, नवनाथ धोत्रे, देवराव जाधव, विठ्ठल घोगरे, पंडित साबळे, गजानन दुभळकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
आदिवासी समाजाच्या वतीने शासनाचा निषेध करत केले आंंदोलन
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील येथे वारंगा फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३० सप्टेंबर रोजी दहाच्या सुमारास आदिवासी समाजा च्या विविध मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.याबाबत आदिवासी समाजाच्या वतीने माजी आमदार संतोष टारफे,माजी जि. प. सदस्य सतीश पाचपुते,यांनी शासनाच्या विरोधात भाषणातून रोष प्रगट करण्यात आला. तसेच माजी आमदार संतोष टारफे यांनी महाराष्ट्र शासन आदिवासी समाजाची कशी फसवणूक करीत आहे, असे आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे काही वाहतुकीची कोंडी झाली होती. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रमुख मागण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करून समाजाला आदिवासी समाजात घुसखोरी पासून प्रतिबंध करावा,धनगर समाजाला आदिवासी मधील आरक्षण चा निर्णय महाराष्ट्र शासनाने तात्काळ मागे घ्यावा,धनगर समाजाच्या संदर्भात आदिवासी असल्याचा कोणताही असविधानिक निर्णय शासनाने घेऊन नये,धनगर समाजासाठी नेमलेल्या विविध समित्याचे अहवाल सुप्रसिद्ध करण्यापूर्वी टाटा समाजशास्त्र संस्थेचा अहवाल जाहीर करावा,सर्वोच्च न्यायालयाने धनगर हे आदिवासी नाहीत असेसिक्कामोर्तब केले आहे.
परंतु महाराष्ट्र शासन सरकारचे मनमानी कारभार करून आदिवासी समाजावर अन्याय करणारा जीआर काढू नये,तो तात्काळ मागे घ्यावा,मधुकर शिंदे समिती स्थापन केलेला आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी.धनगर समाज हा आदिवासी समाजाचे कोणतेही निकष पूर्ण करत नाही.अशा विविध मागणीचे निवेदन माजी आमदार संतोष टारफे,माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते व आदिवासी समाज बांधवाकडून पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना आदिवासी समाजाकडून निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस फौज फाटासह चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके,जमादार शेख बाबर,रोहिदास राठोड, प्रभाकर भोंग,रामदास ग्यादलवाड यांच्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वसमत औंढा रस्त्यावर नागेशवाडी टी पॉईंट येथे आदिवासी समाजाचा रास्ता रोको आंदोलन
आंैढा नागनाथ: वसमत- औंढा रस्त्यावर नागेशवाडी टी पॉईंट येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्या अनुषंगाने ३० सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी साडेदहा ते अकरा या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये तसेच अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे विशेष पदभरती मोहिमेद्वारे तात्काळ भरण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यादरम्यान नांदेड वसमत मार्गे नागेशवाडी मार्गे छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी व छत्रपती संभाजी नगर कडून जिंतूर नागेशवाडी वसमत नांदेड कडे जाणारी, तसेच जवळाबाजार मार्गे परभणी कडे जाणारी सर्व वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.विविध मागण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी तुळसाबाई टारफे, एकनाथ खंदारे, श्रीकांत नाईक, सर्जेराव नाईक, बाबासाहेब खंदारे, भीमराव नाईक, कृष्णा नाईक, पंचफुलाबाई नाईक वर्षा नाईक प्रजावती खंदारे, मदन नाईक, बाबासाहेब खंदारे यांच्यासह आदिवासी समाज बांधव यांची उपस्थिती होती जमादार दिलीप नाईक, संदीप टाक, यशवंत गूरूपवर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
फाळेगाव फाट्यावर शासनाच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन
फाळेगाव: आदिवासी समाजाच्या संवैधानिक हक्काच्या बाबतीमध्ये समाजावर वारंवार अन्याय होत आहे, शिवाय दर्या खोर्यामध्ये राहणारा मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर जाती आरक्षण मागत आहेत त्यामुळे इतर जातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये व इतरही काही मागण्यासाठी व शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आदिवासी समाज बांधवाकडून हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर फाळेगाव फाटा येथे रास्ता रोको विविध घोषणा करत आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासन यांना बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर उत्तम असोले, डॉ. विष्णु डवले, राम असोले, महादेव असोले, डॉ. रवि बोंडखे, सुरेश सोनटक्के, शंकर गाढवे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.