आगामी दिवाळी सणाला आनंदाचा शिधा मिळणार काय?
मानोरा (Ration Card) : गरिबांना सण उत्सव गोड साजरा करता यावा, याकरिता सरकारने गाजावाजा करून सन २७ सप्टेंबर २०२२ च्या निर्णयाद्वारे स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत होते. मात्र यंदा गौरी, गणपती, दसरा व नवरात्र उत्सव संपले असतानाही आनंदाचा शिधा जिन्नस किट वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे निदान आगामी दिवाळी सणाला आनंदाचा शिधा मिळणार काय? याची प्रतीक्षा गोरगरीब लाभार्थी कुटुंबाला लागली आहे. शासनाकडून केवळ १०० रुपयात सन उत्सव साजरा करता यावे म्हणून एक किलो प्रमाणे साखर, चणाडाळ, रवा व पाम तेल रास्त भाव धान्य दुकानातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीपुर्वी वितरीत करण्यात आले. निवडणुका संपल्यानंतर गरीबांचा आनंदाचा शिधाच हरविल्याचे बोलले जात आहे.
गरिबाचा आनंदाचा शिधा हरविला की काय अशी चर्चा!
महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सन उत्सव काळात आनंदाचा शिधा रास्त दुकानाच्या माध्यमातून देणे सुरू केले. त्यावेळी या आनंदाच्या शिधामध्ये १०० रुपयात चार जिन्नस दिले जात होते. आता गौर , गणपती आटोपले, नवरात्र उत्सव व दसराही संपला. पुढे १५ दिवसावर दिवाळी आली असुनही राज्य शासनाकडून (State Govt) मात्र आनंदाच्या शिधाला घेऊन अद्यापही काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे गरिबाचा आनंदाचा शिधा हरविला की काय अशी चर्चा गोरगरीब कुटुंबामधून ऐकावयास येत आहे. येणारे दिवाळी सणात आनंदाचा शिधा मिळणार की काय ? असा सवालही लाभार्थी कुटुंबाकडून केला जात असल्याने आनंदाचा शिधाचा शासन (Government) स्तरावरून मावळतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला की काय या चर्चेला होऊ ऊत आला आहे.


