मानोरा(Manora) :- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांवर मागील काही दिवसांपासून ई – पॉज मशीन (E-pause machine) सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटप करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या सूचनेनुसार मानोरा तालुका संघटनेने ई – पॉज मशीन जमा करुन घेण्याची विनंती दि. ५ ऑगस्ट रोजी निवासी नायब तहसीलदार संदीप आडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्व्हर डाऊन (Server Down)असल्याने धान्य वाटपास अडचणी निर्माण होऊन त्यामुळे ग्राहक दुकानदारास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी १ ऑगस्ट रोजी या संदर्भात संघटनेने तहसिल कार्यालयास पूर्व सूचना दिली होती. त्यामुळे ई – पॉज मशीन जमा करुन घेण्याची विनंती संघटनेने केली आहे. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष राठोड, पदाधिकारी प्रेमसिंग राठोड, कैलास राठोड, डॉ देवानंद राठोड, बाळू राठोड, मनवर, पवार आदींसह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.