लातूर (Latur):- मंत्रालय नियंत्रण कक्षातील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने लातूरसह परभणी, जालना, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्टबाबत सावध केले आहे. रविवारी या भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा (Red alert)) इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तुरळक भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील
रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी चार नंतर तीन चार तासात या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच लातूरसह परभणी, जालना, बीड, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास लातूर व औसा तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटे दोन पासून जोरदार पाऊस काही भागात झाला. त्यानंतर सकाळी कमी-अधिक प्रमाणात संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्हा प्रशासन नेमके करते काय?
हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर लातूर जिल्हा प्रशासनाकडून काही हालचाल होईल, अशी आशा होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील लोकांना सावधानतेबद्दल किंवा आपत्ती व्यवस्थापनाबद्दल कोणतीही माहिती रविवारी चार वाजेपर्यंत दिली गेली नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासन नेमके करते काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.