मानोरा(Washim):- तूर पिक शेतकऱ्यांच्या घरी यायच्या अगोदर तुरीला चांगला भाव होता, मात्र तूर पिक येताच भावात कमालीची घसरण झाली असुन तुरीला किमान हमी दर तरी मिळावा, यासाठी शासकीय खरेदी करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
यंदा तूर पिक देणार, हातावर तुरी ?
खरीप हंगामातील तूर पिकाला आंतरीक नगदी पीक म्हणून पाहिले जाते, मागील वर्षी तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तुरीच्या दरातील तेजी बघता यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली. यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना धोका दिला. नैसर्गिक संकट व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त आंतरीक नगदी तूर पिकावर होती. सध्या तालुक्यात तूर पिक काढणीचा हंगाम सुरू आहे. सततच्या बदल होणाऱ्या हवामानामुळे(weather) तूर पिकांचे उत्पादन एकरी दोन ते तीन क्विंटल उतारा हाती येत आहे.
शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची अपेक्षा
काही भागातील तूर कापणी झाल्याने नवीन तूर बाजारात विक्रीसाठी येत आहे. बाजारात तुरीला ६५०० ते ७००० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सध्या बाजारात आवक अल्प असुन येणाऱ्या काळात बाजारपेठेत तुरीची आवक वाढणार आहे. केंद्र सरकारने तुरीला ७५५० रूपये एवढा हमीभाव भाव जाहीर केला आहे. या दरापेक्षाही बाजारात तुरीला कमी भाव मिळत आहे. आता नवीन तूर बाजारात दाखल होताच हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळावा. यासाठी हमीभावाने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे.