मानोरा(Washim):- तालुक्यातील कारखेडा येथील अरुणावती नदीपात्रात मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत (Department of Water Conservation) बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेत शिवाराचा काही भाग कायमस्वरूपी नुकसानग्रस्त होत असल्याची तक्रार बाधित शेतकऱ्याकडून करण्यात आल्याची दखल वाशिम जिल्ह्यामध्ये या विभागामार्फत बंधाऱ्यांची तपासणी व चौकशी करण्यासाठी आलेल्या नागपुर येथील मृद व जलसंधारण विभागाच्या प्रादेशिक दक्षता गुण नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतशिवारात खड्डे पडल्यामुळे पिके घेणे आता दुरापास्त
या समितीच्या सदस्यांनी कारखेडा येथील वादग्रस्त बंधाऱ्याला भेट देऊन चौकशी केली. तक्रारधारक शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी दैनिक देशोन्नतीने (Dainik Deshonnati) सर्व प्रथम बातमी उजागर करून न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. कारखेडा येथील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी वाशिम यांचे कडे गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तक्रार केली होती. उपरोक्त विभागाने खाजगी केंद्र मार्फत जेवळी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली. त्यावेळी सदरील शेतकर्याच्या ग. क्र. २५२ मधील अर्धा एकर शेत शिवारातून बेकायदेशीर मातीची उचल केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतशिवारात खड्डे पडलेत त्याठिकाणी पिके घेणे आता दुरापास्त झाले आहे.
सदोष पद्धतीने बांधण्यात आलेल्या या कोल्हापुरी बधार्यामुळे मालकीच्या शेतशिवाराच्या बांधाची अपरिमित हाणि झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाकडे नोंदवून नुकसान भरपाईची व बांध पुर्ववत करून देण्याची मागणीही
केली होती.