लातूर (Bird flu) : उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. तसेच कावळे मृतावस्थेत आढळलेल्या ठिकाणांच्या ५ किलोमीटर परिघातील सर्व कुकुट फार्म, चिकन सेंटर आणि पक्ष्यांशी संबंधित ठिकाणांची तपासणी केली. या ठिकाणांहून रक्तजल, क्रोएकल व ट्रकीयल स्वॅबचे 48 नमुने संकलित करून औंध येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या सर्व नमुन्यांवर बर्ड फ्लू (Bird flu) अर्थात एवेन इन्फ्ल्यूएंझा विषाणूसाठी तपासणी करण्यात असून या तपासणीचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत. त्यामुळे या कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय, हुतात्मा स्मारक बालउद्यान, महात्मा गांधी उद्यान पाण्याच्या टाकी परिसरातील कावळ्यांचा मृत्यू (Bird flu) बर्ड फ्लूने झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीने या परिसराच्या 10 किलोमीटर परिघात अलर्ट झोन घोषित केला. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यानुसार या परिसरातील 5 किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्ष्यांचे 48 नमुने बर्ड फ्लूसाठी निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उदगीर परिसरातील पशुपालक आणि नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. शिजवून चिकन, अंडी आणि मांस सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहून आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही पक्ष्यांचा अनैसर्गिक मृत्यू आढळून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सर्व कुक्कुटपालकांनी शेतीतील स्वच्छता व जैवसुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चिकन व अंड्याचे सेवन सुरक्षित
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चिकन आणि अंडी व्यवस्थित शिजवून खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. (Bird flu) बर्ड फ्लूचा विषाणू उष्णतेला संवेदनशील असल्याने 70 डिग्री सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमानावर तो नष्ट होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य स्वच्छता पाळून चिकन आणि अंडी सेवन करणे सुरक्षित असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.