परभणी (Parbhani):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक(Retired Teacher), डि.एड, बी.एड अर्हताधारक उमेदवार यांची निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या बाबत शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्णय घेतला आहे.
कंत्राटी तत्वावर होणार शिक्षकांची नियुक्ती
जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतुद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील, असे नाही. पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यात डि.एड व बि.एड. अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उमेदवारांना अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डि.एड. बी.एड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीण होती.
दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतुद
या नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहिल. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या शिक्षकाविरुध्द कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबीत अथवा प्रस्तावित नसावी, चौकशी प्रकरणी शिक्षा झालेली नसावी. सुरुवातीच्या नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहिल. एकूण कालावाधी जास्तीत जास्त ३ वर्ष किंवा संबंधित व्यक्तीच्या वयाच्या ७० वर्षापर्यंत यापैका जे अगोदर घडेल तो राहिल. डि.एड., बी.एड. अर्हताधारक बेरोजगारांना सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागु राहिल. या शिक्षकांना १५ हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येणार आहे.
शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा
सदर कंत्राटी तत्वावर नियुक्त होणार्या शिक्षकांना १५ हजाराचे मासिक मानधन आणि एकूण १२ रजा देय असतील. या शिक्षकांना कोणतेही प्रशासकीय अधिकारी नसतील. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहिल. बंधपत्र, हमीपत्र द्यावे लागेल, असे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.