जेसीबी व रेती सह २० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार
सेनगाव (Illegal sand mining) : तालुक्यातील उमरदरी परिसरात पूर्णा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व सेनगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे २० लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास उमरदरी येथे पूर्णा नदीच्या पात्रात विनापरवाना वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सेनगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता, जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिस व महसूल विभागाच्या पथकाला पाहताच जेसीबी चालक/मालक घटनास्थळावरून पळून गेला. तपासादरम्यान घटनास्थळी विनाक्रमांक जुनी वापरती जेसीबी (किंमत अंदाजे २० लाख रुपये) तसेच सुमारे पाच ब्रास उत्खनन केलेली रेती (अंदाजे किंमत २५ हजार रुपये) असा मुद्देमाल आढळून आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २०,२५, ००० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी दिपक मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक, यांच्या फिर्यादीवरून आरोपी उचित उत्तमराव कुंदर्गे रा. कवरदरी, ता. सेनगाव याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार जीवन मस्के करीत आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.




