हिंगोली (Hingoli):- तालुक्यातील भिरडा येथील विधीज्ञ अॅड.बी.जी. लेमले हे गुरूवारी सकाळच्या सुमारास मॉर्निंगवॉकला गेले असताना कलगाव पाटीजवळ त्यांना भरधाव वाहनाने उडविल्याने जागीच ठार झाले.
हिंगोली तालुक्यातील कलगाव पाटीजवळील घटना
हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील अॅड.भास्कर गंगाराम लेमले (४५) यांचे भिरडा शिवारात शेत असून प्रत्येक दिवशी हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील कलगाव पाटी पर्यंत जात असतात. ४ जुलै गुरूवार रोजी सकाळी ६ च्या सुमारास अॅड.भास्कर लेमले हे नेहमी प्रमाणे मॉर्निंगवॉकला (Morning Walk)गेले असता कलगाव पाटीजवळ भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून उडविल्याने त्यांचा जागीचा मृत्यू (Dead)झाला. या अपघाताच्या घटनेनंतर चालकाने मदत करण्याऐवजी पलायन (Escape) केले. याचवेळी या भागातील काही तरूण धावण्याचा सराव करीत असताना त्यांना अॅड.लेमले हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल्याचे दिसून येताच त्यांनी तात्काळ बासंबा पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, पोलिस उपनिरीक्षक संदीप जमादार, खंडेराव नरोटे, शिवप्रसाद पोले, गजानन गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. अॅड.लेमले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) हिंगोली जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. अॅड.भास्कर लेमले हे मागील अनेक वर्षापासून हिंगोली न्यायालयात विधीज्ञ म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परीवार आहे.