उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेत असतात…
लातूर (Rohit Pawar) : उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेत असतात, असे सांगत राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उदगीर व अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील (Assembly Elections) इच्छुकांना ‘गॕस’वर ठेवले. मात्र अनुभवी लोकांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी पक्ष त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभा राहतो, असे ते म्हणाले. बीडला जी दंगल झाली, ती दंगल बाहेरील लोक आणून घडविण्यात आली. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम हे सरकारच करीत आहे, असा गंभीर आरोप पवार यांनी यावेळी केला. लातूर येथे आ. रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आशाताई भिसे उपस्थित होते.
आ. पवार (Rohit Pawar) म्हणाले, सध्या राज्यात जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून वातावरण गढूळ करण्याचे षडयंत्र सूरू आहे. म्हणून येणारी (Assembly Elections) विधानसभा निवडणूक लक्षात घेता मणिपूर घटनेबाबत काल शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी विधानसभा निवडणुकीआधी राज्यात दंगल घडविली जावू शकते, अशी शंका व्यक्त केली. सध्या राज्यातील महायुतीचे सरकारने कोणतीच विकासकामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना विविध योजना राबवीत असल्याची जाहिरात करावी लागत आहे. हे सर्व निवडणुकीसाठी केलेले नाटक असून, आतापर्यंत या सरकारने जनतेला टोपी घालण्याचेच काम केले आहे. राज्यातील जनता सूज्ञ असून त्यांनी लोकसभा निवडणूकीत जशी महायुतीला टोपी घातली तशीच विधानसभा निवडणुकीतही त्यांना टोपी घालेल, असा घणाघात आ. रोहित पवार यांनी केला.
पुढे बोलताना आ. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे आम्हीं स्वागतच केले आहे. परंतु या योजनेची व्याप्ती आणखी वाढवली पाहिजे. माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण असा शब्दांचा खेळ या योजनेत केला जातो आहे. त्यामुळे तीनही नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचे दिसत आहे. सरकारच्या ज्या योजना सध्या राबवित आहे. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करीत आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
मराठा व धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, आम्ही (Maratha reservation) आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहोत परंतु सरकार याबाबतीत कोणालाही विश्वासात घेत नाही. विरोधकांशी संवाद देखील साधत नाही. त्यामुळे सरकारनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे, व मराठा समाजाचा टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी घटना दुरुस्ती करून तो द्यावा लागेल असे बोलून, याबाबत सरकारनी निर्णय घ्यावा, असे ते (Rohit Pawar) म्हणाले.