Nashik :- देवळाली कॅम्प येथील तालुका विधि सेवा समिती नाशिकरोड व तालुका वकील संघ नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा विद्या प्रसारक समाज संचलित एस. व्ही. के. टी. महाविद्यालयात जागतिक युवा दिनानिमित्त (World Youth Day) बुधवारी ( दि.२८ ) महिला सुरक्षा व अँटी रॅगिंग कायदा शिबिर संपन्न झाले.
युवा हा देशाचा कणा आहे त्यामुळे तो जागृत असणे आवश्यक
याप्रसंगी न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला व न्यायाधीश एन्. के. मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश एन. के. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग कायद्या विषयी माहिती दिली. ते म्हणाले युवा हा देशाचा कणा आहे त्यामुळे तो जागृत असणे आवश्यक आहे. कायद्यांबाबत युवकांमध्ये जागृती नसल्यास शैक्षणिक करियर (Academic career) धोक्यात येऊ शकते. अनेक उदाहरणे देत युवक आणि आजची परिस्थिती समजावून सांगितली. कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी न्यायाधीश श्री व्ही. बी. मुल्ला यांनी महिला सुरक्षा व अँटी रॅगिंग याविषयी माहिती देत असताना अनेक महाविद्यालयांमध्ये घडलेल्या घटनांची माहिती देत रॅगिंग केल्यास होणाऱ्या शिक्षेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शाम जाधव यांनी महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही (CCTV) च्या निरीक्षणाखाली असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनी अधिक सुरक्षित असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रद्धा रारावीकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. सुधाकर पवार तर सूत्रसंचालन प्रा. सविता आहेर यांनी केले. कार्यक्रमाला, प्रा. एस. बी. पाटील,आयक्यूएसी. संचालक डॉ. स्वाती सिंग, प्रा. राजेंद्र सोनावणे, प्रा. प्रियंका कमानकर आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.