सालेकसा (Salekasa police) : शेजारी राहत असलेल्या कुटूंबावर पोलिसांची मोठी कारवाई व्हावी, या उद्देशाने स्वत:च्या घरून दागिण्यासह १ लाख ३५ हजार ३०० रूपयाचा माल चोरी झाल्याचा बनाव केला. ही घटना १२ व १३ मे ची असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी शिवकुमार नागपुरे च्या तक्रारीवरून सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासकार्य हाती घेतले. दरम्यान फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ हेच चोरटे असल्याचे समोर आले. त्यामुळे शेजार्याला फसविण्यासाठी रचलेल्या जाळ्यात फिर्यादीचे अडकले. शिवकुमार नागपुरे व राम नागपुरे असे आरोपींची नावे आहेत.
सालेकसा येथील प्रकरण
सविस्तर असे की, सालेकसा तालुक्यातील सोनपुरी येथील शिवकुमार नागपुरे याच्या घराचे दार तोडून रोख रकमेसह सोनेचांदी असा एकूण १ लाख ३५ हजार ३०० रूपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार १३ मे रोजी सालेकसा पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोनि भुषण बुराडे यांनी तक्रारीची दखल घेत पोलिस कर्मचार्यांना शोधकामी लावले. स्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करून तपासकार्याला सुरूवात करण्यात आली. दरम्यान घटनास्थळावरील भौतिक अवस्था लक्षात घेत फिर्यादीचा भाऊ रामकुमार नागपुरे याला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने भाऊ शिवकुमार नागपुरे याच्यासोबत चोरीचा बनाव केल्याची कबूली दिली.
या प्रकरणात नियमित भांडण होत असलेल्या शेजारच्या नागपुरे कुटूंबाला खोट्या प्रकरणात अडकविण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही कबूली त्याने दिली. यावरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि भुषण बुराडे, पोउपनि महेश विघ्ने, विठ्ठल ठाकरे, इंद्रजीत बिसेन, दुर्गेश तिवारी, लक्ष्मण बंजार, मयुरी नागदिवे, रामेश्वर राऊत, निलेश जांभुळकर, रहांगडाले, विकास वेदक, विकास हेमणे, तुरकर यांनी केली.




