अग्रलेख

उत्तरप्रदेशचा पेपर कठीणच..! 

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तरप्रदेशचे महत्त्व लक्षात घेता काँग्रेसला उत्तरप्रदेश मध्ये आपली ताकद वाढविणे अपरिहार्य आहे.

उत्तरप्रदेशचा पेपर कठीणच..! 

काँग्रेसच्या सार्वभौम राजकारणाला पहिला मोठा धक्का उत्तरप्रदेश मध्येच मिळाला होता. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताचा आकडा काँग्रेस गाठू शकली नव्हती. ही संधी साधत तत्कालीन समाजवादी पक्ष आणि जनसंघाच्या आघाडीने इतर छोट्या - मोठ्या पक्षांना सोबत घेत संयुक्त विधीमंडळ पक्ष स्थापन केला आणि उत्तरप्रदेश मध्ये प्रथमच काँग्रेसेतर सरकार स्थापन झाले. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यानंतर इंदिरा गांधींनी ब्राह्मण - दलित - अल्पसंख्यांक अशी सामाजिक वीण बांधली, या मतपेढीने पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणले. पुढच्या काळात उत्तरप्रदेशच्या राजकारणात बरेच चढ - उतार आले. ऐंशीच्या दशकात उत्तरप्रदेशात राममंदिर आंदोलनाने उचल खाल्ली आणि त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. इंदिरा गांधींनी बसविलेली सामाजिक वीण पार विस्कटली. उत्तरप्रदेशच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा ब्राह्मण समाज काँग्रेस पासून दुरावला. दलितांना काशीराम आणि मायावती जवळचे वाटू लागले. यादव आणि मुस्लिम समाजवादी पक्षाकडे वळले. एकूणच काँग्रेसचा सामाजिक आधार जवळपास संपुष्टात आला. त्यामुळे लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत काँग्रेसचा टक्का सातत्याने घसरत गेला. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघी दोन टक्क्यांच्या आसपास मते मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तरप्रदेशचे महत्त्व लक्षात घेता काँग्रेसला उत्तरप्रदेश मध्ये आपली ताकद वाढविणे अपरिहार्य आहे. सध्या काँग्रेस अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी करीत असला तरी स्वतःचा टक्का वाढवणे देखील काँग्रेससाठी तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेस पक्ष पावले टाकत असल्याचे दिसत देखील आहे. नुकतेच काँग्रेसने एक मोठी खेळी करीत उत्तरप्रदेशच्या अध्यक्षपदी आराधना मिश्रा या ब्राह्मण महिलेची नियुक्ती केली. या नियुक्तीमागचे राजकारण तसे स्पष्टच आहे. एकेकाळी काँग्रेसचा खंदा समर्थक असलेला ब्राह्मण वर्ग मधल्या काळात राम मंदिर आंदोलनामुळे आणि नंतर उत्तरप्रदेशच्या राजकारणात निर्माण झालेल्या जातीय गट-तटामुळे काँग्रेस पासून दुरावला. उत्तर प्रदेशाच्या राजकारणात प्रभावी असलेला हा वर्ग पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने एका ब्राह्मण महिलेकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे. अलीकडील काळात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता. या गैरव्यवहारामुळे ब्राह्मण वर्गातील भाजपच्या प्रतिष्ठेला नक्कीच आघात पोहोचला आहे. या पृष्ठभूमीवर भाजपवर नाराज झालेल्या ब्राह्मण समुदायाला आपल्याकडे खेचण्यात काँग्रेस यशस्वी झाली तर काँग्रेसच्या जनाधारात बऱ्यापैकी वाढ होऊ शकते, अर्थात हे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. राजकीय दृष्ट्या उत्तरप्रदेशातील ब्राह्मण समाज अतिशय जागृत आहे. काँग्रेस सोबत आपण गेलो तरी काँग्रेस स्वबळावर उत्तरप्रदेशात सत्ता स्थापन करू शकणार नाही याची जाणीव या वर्गाला आहे. काँग्रेसला अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल ही वस्तुस्थिती समोर दिसत असल्यामुळे कदाचित अखिलेश यादव नको या नकारात्मक भूमिकेतून ब्राह्मण समुदाय पुन्हा एकदा भाजपलाच साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी एक राजकीय खेळी म्हणून काँग्रेसच्या या भूमिकेचे समर्थन करता येईल शिवाय काँग्रेसने इतर समाज घटकांनाही आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते कार्यकारी अध्यक्षपदी इम्रान मसुद यांची नियुक्ती करून काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला हे दिसतच आहे. दोन वरिष्ठ उपाध्यक्षांपैकी एक दलित समाजाचे तर दुसरे इतर मागासवर्गीय समाजाचे आहेत.एकूणच कधी काळी इंदिरा गांधींनी जी सामाजिक वीण तयार केली होती आणि ज्या सामाजिक गणिताच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा उत्तरप्रदेश मध्ये बळकट केले होते त्याचाच कित्ता आता राहुल आणि प्रियंका गिरवत असल्याचे दिसते. परंतु योगींची लोकप्रियता भाजपचे अगदी तळागाळापर्यंत पोहोचले संघटन आणि जातीय समीकरणात अजूनही उजवा ठरत असलेला भाजप, हे सगळे बघता उत्तरप्रदेशचा पेपर याही वेळी काँग्रेससाठी कठीणच असेल असे दिसते.