अग्रलेख

ट्रम्प यांचे खायचे दात...!

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून ट्रम्प यांचा भारतावर विशेष राग होता, परंतु आता तेच ट्रम्प त्याच रशियाकडून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करीत आहेत.

ट्रम्प यांचे खायचे दात...!

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणण्याच्या हेतूने अमेरिकेने अनेक निर्बंध लादले. रशियाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत इंधनच होता आणि आहे. रशियाच्या इंधन विक्रीवर निर्बंध लादल्यास रशियाची आर्थिक स्थिती कमकुवत होईल. युद्धाचा खर्च रशियाला परवडणार नाही, परिणामी युद्ध थांबविणे पुतीन यांना भाग पडेल, अशी ही एकूण रणनीती होती. त्यासाठी अमेरिकेने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून ट्रम्प यांचा भारतावर विशेष राग होता, परंतु आता तेच ट्रम्प त्याच रशियाकडून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करीत आहेत. रशियाकडून डिझेल खरेदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या निर्णयाने जागतिक राजकारणातील अमेरिकेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतात, महत्त्वाचे असतात ते केवळ राष्ट्रीय हितसंबंध या विधानाची प्रचिती पुन्हा एकदा जगाला आली आहे. ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी चर्चेनंतर रशियाकडून अमेरिकेला आणि जागतिक बाजारपेठेला डिझेलचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होणार असल्याची घोषणा केली. सुरुवातीला तीन लाख टनांहून अधिक डिझेल पुरवठ्याची घोषणा करण्यात आली असून, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अमेरिकेने रशियन इंधनावरील काही निर्बंध तात्पुरते शिथिल केले आहेत. अमेरिकेतील वाढत्या इंधनदरांवर नियंत्रण मिळविणे आणि आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना दिलासा देणे, हा या निर्णयामागील प्रमुख हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. रशियाच्या ऊर्जा निर्यातीतून मिळणारा पैसा कमी करणे आणि त्याच्या युद्धयंत्रणेला आर्थिक रसद मिळू न देणे, हा या निर्बंधांचा प्रमुख उद्देश होता. रशियाच्या आक्रमणाला विरोध करण्यासाठी लोकशाही, सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संरक्षणाची भाषा वापरण्यात आली. परंतु, आज त्याच रशियाकडून डिझेल खरेदी करण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. याचा अर्थ देशांतर्गत संकट निर्माण झाले किंवा लोकांचा रोष वाढू लागला की नैतिकतेचे निकष आणि मुखवटे आपोआप गळून पडतात असेच म्हणावे लागेल. ट्रम्प यांची भूमिका व्यवहारवादी असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाईल. अमेरिकन नागरिकांना महागाईपासून दिलासा देणे, उद्योगधंद्यांना स्वस्त इंधन उपलब्ध करून देणे आणि वाहतूक खर्च कमी करणे, ही कोणत्याही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करणे चुकीचे नाही. परंतु, एखाद्या देशाच्या युद्धखोर धोरणाला विरोध करण्यासाठी निर्बंध लादायचे, त्यासाठी जगाला वेठीस धरायचे आणि नंतर स्वतःच्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्यावर त्याच देशाला व्यापाराची संधी द्यायची, अशा परिस्थितीत त्या निर्बंधांच्या नैतिक आणि राजकीय विश्वासार्हतेचे काय, हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे. रशियाकडून इंधन विकत घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे रशियाला केवळ आर्थिक फायदा होणार नसून या युद्धासाठी नैतिक बळ देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या करारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते रशियाला ऊर्जा व्यापारातून अधिक महसूल मिळाल्यास युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्याची त्याची क्षमता वाढू शकते. युक्रेन आणि अमेरिकेतील चर्चेच्या काळातच ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी कराराची घोषणा केल्याने या निर्णयाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे युक्रेनला युद्ध थांबविण्यासाठी वाटाघाटी करण्याचा सल्ला द्यायचा, तर दुसरीकडे रशियाशी आर्थिक व्यवहार वाढवायचे, या भूमिकेतून अमेरिकेच्या धोरणातील विसंगती स्पष्ट होते. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले, तेव्हा अमेरिकेकडून भारतावर व्यापारविषयक दबाव आणण्यात आला. रशियाशी असलेल्या ऊर्जा संबंधांबाबत भारताला वारंवार प्रश्न विचारण्यात आले. आता मात्र अमेरिकाच आपल्या गरजांसाठी रशियन इंधनाच्या पुरवठ्याचा मार्ग स्वीकारत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, तर तो आंतरराष्ट्रीय राजकारणातील आक्षेपाचा विषय ठरतो आणि अमेरिकेने रशियाकडून डिझेल घेतले, तर तो आर्थिक गरजेचा व्यवहार, हा दुटप्पीपणाच ट्रम्प यांचे खायचे खरे दात दाखविणारा आहे.