आकलन

 संन्यासी भागवत बोलले, “सत्ताबदलापासून सावध”

राजकारण हा संघाचा विषय नाही , राजकारणापासून संघ दूर असतो, असे पालुपद भागवती संन्यासी प्रचारक आणि  काळ्या टोपीखालील दंडधारी  अंधनिष्ठांकडून सातत्याने ऐकवले जाते.

 संन्यासी भागवत बोलले, “सत्ताबदलापासून सावध”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या भाषणात देशातील आंदोलनांमागे परकीय शक्तींचा हात असल्याचा दावा करत सत्ताबदलाच्या प्रयत्नांबाबत सावधगिरीचा इशारा दिला. मात्र, सरकारविरोधी आंदोलने म्हणजे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. संघाची राजकारणाबाबतची भूमिका, मोदी सरकारचा कारभार, तरुणांचे आंदोलन आणि सत्ताबदलाच्या मुद्द्यावरून भागवत यांच्या विधानांचे राजकीय अर्थ नेमके काय ?

काल, २० ऑक्टोबर २०२६ रोजी नागपुरातील रेशीमबाग येथे विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी  भाषण केले. दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालकांनी संघ स्वयंसेवकापुढे “मौलिक” (?) भाषण करणे ही संघाची प्रथा/परंपरा आहे.‌ तथापि, यावेळचे भाषण संघबाह्य घटकांच्या दृष्टीने दखलपात्र यासाठी आहे की, संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर हे भाषण झाले.
विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसारीत आणि प्रक्षेपित केलेल्या वृत्तानुसार, भागवत यांनी केलेल्या भाषणातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातील आंदोलने, सत्ताबदलाची शक्यता आणि त्यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा त्यांचा  दावा! 
राजकारण हा संघाचा विषय नाही , राजकारणापासून संघ दूर असतो, असे पालुपद भागवती संन्यासी प्रचारक आणि  काळ्या टोपीखालील दंडधारी  अंधनिष्ठांकडून सातत्याने ऐकवले जाते. हे शब्द टोकदार  असले तरी, स्पष्ट भूमिका मांडणे, हा आमचा नाईलाज आहे.
भागवत यांच्या कालच्या भाषणाची दखल घेणे गरजेचे आहे.
भाषणात भागवत यांनी भारतातील काही आंदोलनांचा संदर्भ देत, समाजात असंतोष निर्माण करून देशाच्या संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. फ्रान्स, बांगलादेश आणि अन्य देशांतील अस्थिरतेचा उल्लेख करून भारतातही अशा घडामोडी घडवण्याचे प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सूचित केले. 
‘रेजीम चेंज’ म्हणजे सत्ताबदल.
भागवत यांनी भारतात सत्ताबदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांबाबत सावधगिरीचा इशारा दिला. आंदोलनांचे रूपांतर राजकीय संघर्षात करून देशात अस्थिरता निर्माण केली जाऊ शकते, अशी त्यांची भूमिका होती. भागवत महोदय, आपणास‌ इतिहास माहीत नाही, असे कसे समजायचे? सरकारविरोधी आंदोलन म्हणजे देश अस्थिर करण्याचा प्रयत्न, असे सरसकट मानता येईल का? लोकशाहीत सरकारच्या धोरणांना विरोध करणे आणि हिंसक मार्गाने सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. १९७५ ची आणीबाणी लागू करण्यासाठी आवश्यक ती राजकीय पार्श्वभूमी तयार करून तत्कालीन सरकारची कोंडी करण्यात  संघाची भूमिका शून्य होती काय? त्यावेळी संघासाठी ती स्वातंत्र्याची लढाई असेल तर, आजचे आंदोलन देशद्रोही शक्तींचे आंदोलन कसे? राजकीय नेते सोयीनुसार बोलतात, वागतात. साधनशुचिता आणि वैचारिक-तात्विक शुद्धतेचा आग्रह धरणाऱ्या संघ प्रमुखांनीही सोयीचे बोलावे, हे आश्चर्यच आहे. 
या धर्मनिरपेक्ष भारतात एक तपापासून संघनिष्ठ दंडाधिकारी सत्तेवर आहेत. या सरकारच्या एककल्ली कारभाराविरुद्ध, अघोषित आणीबाणीसद‌ृश्य हुकूमशाहीविरुद्ध आज तरुणवर्ग रस्त्यावर उतरला आहे. त्यास अराजक म्हणाल काय? या आंदोलनामागे परकीय हात आहे, असा  आरोप आपण केला आहात. यात तथ्य किती? न्याय देणारे सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळी जनतेपुढे रस्त्यावर उतरण्याखेरीज अन्य मार्ग  असत नाही.  ही परिस्थिती मोदी सरकारनेच  निर्माण केली आहे.
आमचे आकलन स्पष्ट आहे. जेन झी चे आंदोलन आणि मतचोरीविरुद्ध कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात  संघाची भूमिका काय आहे? याची जाणीव सर्वांना झाली. संघाला सत्तेचा मोह नाही असे सांगणारे भागवत सत्ता बदल नको म्हणतात, याचा अर्थ काय? संघाला सत्ता पाहिजे आहेच. ती २०१४ साली निरंकुशतेसह  मिळाली. धर्माधिष्ठित राज्यसत्ता असावी, हे संघाचे ध्येय आहे. त्यामुळे मिळालेली सत्ता टिकली पाहिजे, या हेतूनेच भागवत यांनी रेजिम चेंजला विरोध केला आहे.
+++++++++++ 
चार दिवसांपूर्वी एका दैनिकातील बातमीचे शीर्षक होते - “मंत्रिमंडळ बदलासाठी पंतप्रधान चार दिवस दिल्लीतच”. हे शीर्षक विविधांगी आहे. व्यंगही स्पष्ट करते. मोदी “अनिवासी भारतीय प्रधानमंत्री” आहेत, यावर शिक्कामोर्तब करणारे हे शीर्षक आहे. भक्तांना राग येईल; परंतु, दृश्य चित्र बातमीदाराने मांडले आहे.‌ भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी मोदी सतत परदेश दौऱ्यावर असतात, हा समज- गैरसमज दृढ झाला आहे.‌ 
मोदींमुळे भारताची प्रतिमा उजळली आहे असा भ्रम गोदी मीडियाने‌ पसरवला आहे. भारत जगाला शास्त्रज्ञांचा पुरवठा करील असे विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. चला एकविसाव्या शतकात, अशी त्यांची घोषणा होती.
कॉंंंग्रेस राजवटीने, डॉ. मनमोहनसिंग सरकारने अतिशय समृद्ध परकीय चलन गंगाजळीसह भक्कम अर्थव्यवस्था   मोदींच्या हातात दिली. पाच वर्षे देशाला धान्य पुरवठा होईल, एवढे धान्याचे साठेही कॉंंग्रेसनेच निर्माण केले होते. त्या समृद्धीसह विशाल बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळही कॉंंग्रेसची देणगी आहे. त्या पुण्याईवर मोफत धान्य पुरवठ्यासारख्या योजना राबविणारे मोदी दूरदृष्टीचे नेते होऊ शकतात काय? 
डॉ.राहत इंदोरी यांनी एकदा ऐकवले होते -
“चले ते सूरज बनाने
पसिने छुट गए
एक दिया बनाते बनाते....”
भागवत महोदय, भारतात बदल होत आहे...जेन झी ने निर्माण केलेले प्रश्न‌ मोदी आणि सरकारपुढे आ वासून उभे आहेत. सत्तेचा अमर पट्टा घेऊन कोणीही जन्मलेले नाहीत. रेजिम  चेंज होईलच! ! 

 

 प्रभाकर कोंडबत्तुनवार
 मो. नं. ९४०५७५०४६०
(लेखक प्रसिद्ध‌ पत्रकार 
आणि ज्येष्ठ संपादक आहेत)