आकलन

संस्थांना करोडो डॉलरचा निधी! चौकशी कधी?

कॉंग्रेसला चीनकडून पैसा मिळाला की नाही, यावर भाजपाला वादविवाद घडवून आणायचे असतील तर त्यांनी तसे करावे. त्यांना अडवणार कोण?

संस्थांना करोडो डॉलरचा निधी! चौकशी कधी?

चीनकडून काँग्रेसला परकीय निधी मिळत असल्याचा भाजपचा आरोप आणि त्याविरोधात सुरू केलेले आंदोलन यावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, विरोधकांवर परकीय निधीचे आरोप करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थांच्या परदेशी निधीचे स्रोतही तपासले जाणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधन अहवालांचा दाखला देत सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

चीनकडून कॉंंग्रेसला पैसा मिळत आहे. कॉंग्रेससह इतर विरोधी पक्ष या देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप करीत, या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर‌ उतरला आहे,  आंदोलन करीत आहे. हे तर  महान आश्चर्य ! दिल्लीतील विद्यार्थी आणि जेन झीचे आंदोलन दडपण्यासाठी चाळीस हजार जवान‌ तैनात करणारे सत्ताधारी रस्त्यावर आले आहेत! सैतानाच्या तोंडी बायबल!!‌ टीका कठोरच आहे. आमचाही नाईलाज आहे. गांधीजींच्या मारेकऱ्यांचा उदोउदो करणाऱ्यांना शेवटी गांधीगिरीचा मार्ग निवडावा लागला! 
राहूल गांधी अलिकडे आक्रमक झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवा, ही विरोधी पक्षांची मागणी निष्प्रभ करण्यासाठी सरकार संपूर्ण सर्कस करीत आहे. यावरून, ज्ञानेशकुमारचे सरकारवरील उपकार लक्षात यावेत. सरकार पाठीशी असल्याने संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करूनच ज्ञानेशकुमार पदावरून जातील, असे दिसते.  त्यांना मुदतीपूर्वीच पद सोडावे लागल्यास, विरोधी पक्षांसाठी आस्मान ठेंगणे होईल. अलिकडे भारतातील  उजव्या सत्ताधाऱ्यांनी डाव्या विचारसरणीविरोधात मोहीम सुरू केली असल्याचे उघडपणे जाणवते. प्रधानमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणात ‘दिमागी  नक्सली’ शब्द वापरणे, ही या मोहिमेची सुरूवात होती. आता, डाव्यांची सत्ता असलेल्या चीनकडून कॉंंग्रेसला  निधी मिळत असल्याचा आरोप मोदी भक्त आणि मोदीनिष्ठांकडून गल्ली ते दिल्लीपर्यंत केला जात आहे. त्यात तथ्य किती? पुरावे असतील तर दाखवले पाहिजे. सत्ता हातात असणाऱ्यांनी फौजदारी स्वरुपाचे आरोप करणे हास्यास्पद ठरते.
कॉंग्रेसला चीनकडून पैसा मिळाला की नाही, यावर भाजपाला वादविवाद घडवून आणायचे असतील तर त्यांनी तसे करावे. त्यांना अडवणार कोण? तथापि, भाजपाची “वैचारिक माता” असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्पन्न आणि उत्पन्नाची साधने कोणती? याचीही माहिती जनतेसाठी उघड केली पाहिजे. संघाशी संबंधित विविध संघटनांना मिळणाऱ्या करोडो डॉलर्सच्या परकीय निधीचीही चर्चा झाली पाहिजे. चौकशीही झालीच पाहिजे.
परदेशातील राजकीय विश्लेषक आणि शोध पत्रकारांच्या विविध  संस्था संघाला अति उजवी विचारसरणीची जगातील सर्वांत मोठी संघटना समजतात. संघामुळे लोकशाहीला धोका आहे, द्वेष वाढविण्यात संघाची मोठी भूमिका आहे, असा थेट आरोप या संस्था करतात. परदेशातील देणगीदार संस्थांकडून संघाशी संबंधित संस्थांना मिळणाऱ्या निधीवर, या निधीच्या उपयोगावरही काही परदेशी संस्था लक्ष ठेवून आहेत. सबरंग कम्युनिकेशन्स आणि साऊथ एशिया सिटिझन्स वेब, या दोन संस्थांनी २००२ साली “The +Foreign Exchange Of Hate : IDRF and the American Fundings of Hindutva” या शीर्षकाखाली विस्तृत अहवाल प्रकाशित केला. या अहवालातील IDRF ( India Development and  Relief Fund ) ही संस्था अमेरिकेत 1988/89साली स्थापन करण्यात आली. या संस्थेने विकास भारती  बिहार‌, स्वामी विवेकानंद रूरल डेव्हलपमेंट सोसायटी  तामिळनाडू , सेवा भारती दिल्ली,  जनसेवा विद्या केंद्र कर्नाटक,  वनवासी कल्याण आश्रम मध्य प्रदेश आणि गुजरात, गिरीवासी वनवासी सेवा प्रकल्प उत्तर प्रदेश, देशपांडे वनवासी वसतीगृह महाराष्ट्र यांना पैसै दिले. यासोबतच, एकल विद्यालये, विकसन फौंडेशन, योग भारती,  विवेकानंद केंद्र योग रिसर्च फौंडेशन, भारत विकास परिषद याचाही उल्लेख अहवालात आहे.
IDRF च्या संकेतस्थळावर भारतातील ६७ लाभार्थी संस्थांची यादी दिली होती. अहवालानुसार 
६७ पैकी ५२ संस्थांचा संघ परिवाराशी स्पष्ट संबंध असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
१५ संस्थांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे वर्गीकरण निश्चित करण्यात आलेले नाही.
महाराष्ट्रातील लाभार्थी लाभार्थींच्या या यादीत महाराष्ट्रातील खालील आठ संस्थांचा समावेश आहे - 
(महाराष्ट्रातील नोंदविलेल्या संस्था)- देवी अहिल्याबाई स्मारक समिती – नागपूर, गोपाल नवजीवन केंद – पुणे,  वात्सल्य ट्रस्ट – भांडुप, डॉ. हेडगेवार रक्तपेढी  – नागपूर, वनवासी कल्याण आश्रम – दादरा नगर हवेली, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन– नागपूर, वनवासी कल्याण आश्रम – नागपूर,  वनवासी कल्याण आश्रम –नाशिक,  विवेकानंद मेडिकल फौंडेशन – लातूर, जनकल्याण समिती– पुणे,  क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती– पुणे, आणि
Late Mohan Thuse Eye Hospital – नारायणगाव.
वरील  संशोधन अहवाल हा २००२ चा आहे. त्यातील लाभार्थी संस्थांची यादी ही त्या काळातील IDRF च्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. 
*’बेलिंगकॅट’ (Bellingcat) संस्थेचा शोध अहवाल*
आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारिता गट Bellingcat ने  ६ ऑक्टोबर २०२६ रोजी “Groups Associated With India’s Far - Right Receive Millions Through USDonor- Advised Funds” (मराठीत - भारतातील उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित संस्थांना अमेरिकेतील देणगीदार-नियंत्रित निधी व्यवस्थेमार्फत लाखो डॉलर) या शीर्षकाखाली सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला. निधी मिळालेल्या संस्थांचे RSS-संबंधित संघटनांशी असलेले संबंध हा या तपास‌ अहवालाचा केंद्रबिंदू आहे. या अहवालानुसार,  एकल विद्यालय फाउंडेशन यूएसए’ (Ekal USA) आणि ‘सेवा इंटरनॅशनल यूएसए’ (Sewa USA)— या दोन प्रमुख धर्मादाय संस्था
अमेरिकेतील RSS च्या विचारसरणीशी आणि नेटवर्कशी जोडलेल्या आहेत.  या दोन  धर्मादाय संस्थांना २०२० ते २०२४ दरम्यान एकूण $११७.८ दशलक्ष ( सुमारे ९२६ कोटी रुपये ) निधी आणि अनुदाने मिळाली आहेत.
• *भारतात निधीचे हस्तांतरण* वरील ९२६ कोटी रुपयापैकी, ‘एकल यूएसए’ ने सुमारे २६५ कोटी रुपये (३३.७ दशलक्ष डॉलर्स)  भारतातील एकल विद्यालयांना पाठवले. तर ‘सेवा यूएसए’ ने सुमारे 
२३३ कोटी रुपये ( २९.७ दशलक्ष डॉलर्स ) भारत आणि दक्षिण आशियातील प्रकल्पांसाठी हस्तांतरित केले. वरील निधीचा मोठा भाग ( अंदाजे  
२४.४ दशलक्ष डॉलर्स ) • डोनर-अ‍ॅडव्हाइज्ड फंड्स (DAF) द्वारे  आला आहे.‌
या फंडांमध्ये  देणगीदारांची नावे गुप्त ठेवण्याची मुभा असते.
आमचे आकलन स्पष्ट आहे. विरोधी पक्षांना चिरडण्यासाठी हुकुमशाही चे सरकार सदैव “परकीय शक्तींचे पाठबळ” आणि “परदेशी निधी” या शब्दांचा आधार घेत असते. हिंदु- मुस्लीम द्वेष वाढविणाऱ्या संस्था/संघटनांना अमेरिका, कॅनडा आणि यूकेमधून  मिळणाऱ्या, करोडो रुपयांच्या परदेशी  निधीचे लाभार्थी कोण? त्यांचा  “नोंदणी बाह्य” संघाशी  संबंध काय? याची चौकशी कोण करणार? 

 

प्रभाकर कोंडबत्तुनवार 
मो.  ९४०५७५०४६०

( लेखक प्रसिद्ध पत्रकार आणि
 ज्येष्ठ संपादक आहेत)