न बोललेले

दिवाळीचा अंधार बळीराजाच्या दारी!

दुष्काळाने शेती उद्ध्वस्त केली, कर्जाने संसार पोखरला आणि सरकारी मदतीची प्रतीक्षा संपलेली नाही. एकीकडे संपत्तीचे प्रदर्शन, तर दुसरीकडे चुलीची चिंता!

दिवाळीचा अंधार बळीराजाच्या दारी!

दिवाळीच्या सणात शहरांमध्ये रोषणाईचा झगमगाट आणि संपत्तीचे प्रदर्शन सुरू असताना ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी मात्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. खरीप हंगामाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला, सरकारी मदतीची प्रतीक्षा कायम आहे आणि घरखर्चाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाच्या घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचणार तरी कसा? शेतकऱ्यांच्या या विदारक वास्तवावर भाष्य केले आहे

दिवाळीच्या रोषणाईत सगळीकडे समृद्धीचा झगमगाट दिसत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील बळीराजाच्या घरात मात्र अंधार दाटला आहे. दुष्काळाने शेती उद्ध्वस्त केली, कर्जाने संसार पोखरला आणि सरकारी मदतीची प्रतीक्षा संपलेली नाही. एकीकडे संपत्तीचे प्रदर्शन, तर दुसरीकडे चुलीची चिंता! अशा विदारक वास्तवात बळीराजाने दिवाळीचा आनंद साजरा करायचा तरी कसा?
दुष्काळाने शेती उद्ध्वस्त, कर्जाच्या ओझ्याने संसार विस्कटला; एका बाजूला संपत्तीचे झगमगाटी प्रदर्शन, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात जगण्याचाच संघर्ष, दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण! घराघरांत पणत्या लागतात, आकाशात आतषबाजी होते, लक्ष्मीपूजनातून सुख-समृद्धीची कामना केली जाते. मात्र, याच दिवाळीत ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात अंधार दाटलेला आहे. ज्यांच्या कष्टावर समाजाचे पोट भरते, ज्यांच्या शेतात पिकणाऱ्या धान्यामुळे बाजारपेठा गजबजतात, त्यांच्याच आयुष्यात यंदा दिवाळीचा प्रकाश पोहोचलेला नाही. निसर्गाच्या अवकृपेने शेती उद्ध्वस्त झाली, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि कर्जाच्या ओझ्याने संसाराचा गाडा रुतून बसला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाने दिवाळी साजरी करायची तरी कशी?
यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक नुकसानीचा नाही, तर जगण्याच्या आशा पुसून टाकणारा ठरला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन घटले. अनेक भागांत एकरी मिळणारे उत्पादन अत्यल्प राहिले. काही शेतकऱ्यांना पेरणी, खते, औषधे आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही. एकेकाळी एकरी आठ-दहा क्विंटल सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात आज एक-दोन क्विंटलही पडत नाही. उत्पादन नाही, उत्पन्न नाही; पण बँकेचे हप्ते, सावकाराचे तगादे आणि घरखर्च मात्र थांबत नाहीत.

दुष्काळाचे चटके, मदतीची प्रतीक्षा
दुष्काळाची तीव्रता केवळ पावसाच्या आकडेवारीतून मोजता येणार नाही. पाण्यासाठी भटकणारी माणसे, चाऱ्याअभावी कृश झालेली जनावरे, ओस पडलेली शेतशिवारं आणि रोजगारासाठी गाव सोडणारे तरुण हे दुष्काळाचे खरे चित्र आहे. पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना परराज्यांतून चारा विकत आणावा लागत आहे. शेतीत उत्पन्न नसताना जनावरांचा सांभाळ करायचा कसा, हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. जनावरे म्हणजे शेतकऱ्याची संपत्ती; ती विकावी तर पुढचे आयुष्य उध्वस्त आणि जगवावी तर खर्चाचा डोंगर!
सरकारकडून मदतीच्या घोषणा होतात, दुष्काळी तालुके जाहीर होतात, पंचनाम्यांचे आदेश निघतात; मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होतो. कागदपत्रे, ई-पीक पाहणी, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय निकषांच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकतो. ज्याच्या हातात पेरणीसाठी पैसे नाहीत, त्याला मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. दिवाळीपूर्वी मदतीची आश्वासने देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करणे अधिक महत्त्वाचे नाही काय?

लक्ष्मीपूजन कोणाचे करायचे?
शेतकऱ्याच्या घरात असलेली लक्ष्मी आज अनेकदा बँकेच्या कर्जाच्या तारणात अडकली आहे. घरातील दागिने गहाण, जमिनीवर कर्ज आणि हातात रिकामी खातेवही. अशा परिस्थितीत लक्ष्मीपूजनासाठी पणती लावण्यापेक्षा चुलीवर अन्न शिजेल का, याची चिंता त्याला अधिक सतावते. शेतकऱ्याचा खरा देव त्याचे श्रम आहेत. मात्र, त्या श्रमांना बाजारभावाची साथ नाही, घामाला योग्य दाम नाही आणि संकटात शासनाची वेळेवर मदत नाही.एकीकडे संपत्तीचे प्रदर्शन करणारी दिवाळी आणि दुसरीकडे कर्जाच्या खाईत लोटलेला ग्रामीण भारत, ही दोन परस्परविरोधी चित्रे आपल्या अर्थव्यवस्थेतील विषमतेची जाणीव करून देतात. ‘इंडिया’च्या समृद्धीचा डंका वाजत असताना ‘भारत’ मात्र कर्ज, दुष्काळ आणि बेरोजगारीच्या ओझ्याखाली दबला जात आहे. शेतकऱ्यांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या समृद्धीचा लाभ त्यांच्याच वाट्याला येत नसेल, तर विकासाच्या दाव्यांचा उपयोग काय?बळीराजाला दिवाळीच्या शुभेच्छा देणे सोपे आहे; पण त्याच्या घरातील अंधार दूर करणे ही खरी कसोटी आहे. कर्जमाफी, नुकसानभरपाई, हमीभाव, पीकविमा, पाणी आणि पशुधनासाठी चारा या केवळ मागण्या नाहीत, तर ग्रामीण अर्थव्यवस्था टिकविण्याच्या मूलभूत गरजा आहेत. शेतकऱ्याला दान नको, त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला हवा. पंचनाम्यांच्या कागदांपेक्षा हातात मदत हवी. आश्वासनांच्या फटाक्यांपेक्षा जगण्याची हमी हवी.
शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला केवळ निसर्गाची अवकृपा जबाबदार धरून सरकारला हात झटकता येणार नाही. कारण, पाऊस कमी पडला की शेतीचे नुकसान होते, उत्पादन घटले की बाजारभावाची अनिश्चितता वाढते आणि संकटाच्या काळात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कांदा, सोयाबीन, कापूस असो वा तूर, प्रत्येक पिकाच्या बाबतीत शेतकऱ्याला बाजारपेठेच्या लहरीवर अवलंबून राहावे लागते. उत्पादन खर्च वाढत असताना हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांच्यातील तफावत मात्र कायम आहे. अशा वेळी नुकसानभरपाईची तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी शेतीला आर्थिक सुरक्षिततेचे कवच देणारे धोरण आवश्यक आहे. 
विशेष म्हणजे, संकटाच्या काळात शेतकऱ्याला कर्जमाफीचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीचा विषय आला की निकष, पात्रता आणि तांत्रिक अडचणी पुढे केल्या जातात. नियमित कर्जफेड करणारा शेतकरी असो किंवा थकबाकीदार, दोघांनाही यंदाच्या दुष्काळाने आर्थिक संकटात ढकलले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय हा राजकीय घोषणेपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष आर्थिक पुनर्वसनाचा भाग बनला पाहिजे. अन्यथा, पुढील हंगामासाठी पुन्हा कर्ज काढायचे, पुन्हा पेरणी करायची आणि पुन्हा निसर्गाच्या भरवशावर जगायचे, हे दुष्टचक्र कायम राहील. दिवाळीच्या रोषणाईत हा मूलभूत प्रश्न विसरता कामा नये. 
शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा योग्य वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल, तर समृद्धीच्या उत्सवाला सामाजिक न्यायाची जोड कशी मिळणार? कारण, बळीराजाच्या घरात चूल पेटत नसेल, तर शहरातील रोषणाईला समृद्धी म्हणता येणार नाही. शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसल्याशिवाय दिवाळीचा प्रकाश पूर्ण होणार नाही. बळीराजा अंधारात आणि व्यवस्था प्रकाशात, हीच आपल्या सणासुदीच्या समृद्धीची सर्वांत मोठी शोकांतिका आहे!

दीपक पं.  देशमुख
वरिष्ठ उपसंपादक, देशोन्नती
मो -९७ ६४३३५८०८