अग्रलेख

ट्रम्प तात्यांना दणका .......!

महागाई, वाढता जीवनावश्यक वस्तूंचा खर्च आणि आर्थिक भविष्याविषयीची अनिश्चितता यामुळे मतदारांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात प्रचंड असंतोष होता.

ट्रम्प तात्यांना दणका .......!

आपल्या विक्षिप्त राजकीय वर्तनाने संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर अमेरिकेतील मतदारांनी त्यांची जागा आणि योग्यता दाखविली असे म्हणता येईल. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बसलेला मोठा धक्का हा केवळ एका पक्षाच्या पराभवापुरता मर्यादित नाही. तो ट्रम्प यांच्या राजकीय शैलीला, आर्थिक धोरणांना आणि आक्रमक नेतृत्वपद्धतीला मतदारांनी दिलेला स्पष्ट इशारा आहे. या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधिगृह आणि सिनेट या संसदेच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळविल्याने ट्रम्प यांच्या उर्वरित अध्यक्षीय कारकिर्दीसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक आणि तिरसट निर्णयांचा धडाका लावला. आयातशुल्क वाढविणे, अमेरिकेच्या व्यापार धोरणात बदल करणे, स्थलांतराबाबत कठोर भूमिका घेणे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दबावाचे राजकारण करणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये राहिली. मात्र, या आक्रमकतेचा देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, याचा विचार मतदारांनी अधिक गांभीर्याने केल्याचे या निकालातून दिसते. महागाई, वाढता जीवनावश्यक वस्तूंचा खर्च आणि आर्थिक भविष्याविषयीची अनिश्चितता यामुळे मतदारांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात प्रचंड असंतोष होता. व्यापारावर लादलेले अतिरिक्त शुल्क आणि इराणशी संबंधित युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक दबावाचाही सत्ताधारी पक्षाला फटका बसला. ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याचे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीबाबत निर्माण झालेल्या नाराजीने त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेला तडा दिला. राजकारणात राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न, राष्ट्राभिमान आणि आंतरराष्ट्रीय वर्चस्व यांना महत्त्व असतेच; परंतु सामान्य नागरिकाच्या घरातील आर्थिक गणित बिघडले, तर मोठमोठ्या घोषणांचे आकर्षण कमी होते. अमेरिकेतील मतदारांनीही याच वास्तवाची जाणीव करून दिली आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल असमाधान व्यक्त करणाऱ्या मतदारांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा मार्ग निवडला. या निवडणुकीतील पराभवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ट्रम्प यांनी समर्थन दिलेल्या अनेक उमेदवारांनाही मतदारांनी नाकारले. रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांची निवड करताना ट्रम्प यांची पसंती आणि वैयक्तिक निष्ठा यांना अधिक महत्त्व दिले गेले. मात्र, अध्यक्षांचा पाठिंबा मिळाला म्हणजे विजय निश्चित, हा समज मतदारांनी चुकीचा ठरविला. टेक्सास, दक्षिण कॅरोलिना आणि उत्तर कॅरोलिनासारख्या राज्यांतील निकालांनी ट्रम्प यांच्या राजकीय प्रभावाच्या मर्यादा अधोरेखित केल्या. रिपब्लिकन पक्षाची ओळख गेल्या काही वर्षांत ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती केंद्रित झाली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी स्वतंत्र भूमिका घेण्याऐवजी ट्रम्प यांच्या राजकीय भूमिकांशी जुळवून घेण्याचा मार्ग स्वीकारला. अशा परिस्थितीत निवडणुकीतील पराभवामुळे पक्षांतर्गत नेतृत्व, उमेदवार निवडण्याची पद्धत आणि भविष्यातील राजकीय दिशा यांवर नव्याने चर्चा सुरू होणे स्वाभाविक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आल्याने ट्रम्प यांना पुढील काळात अनेक निर्णय घेताना विरोधाचा सामना करावा लागू शकतो. सरकारी खर्च, अर्थसंकल्प, करधोरणे, नियुक्त्या आणि प्रशासनाच्या विविध निर्णयांवर संसदीय नियंत्रण अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांची चौकशी करण्याची आणि त्यांना राजकीयदृष्ट्या उत्तरदायी धरण्याची अधिक संधी मिळेल. तथापि, अध्यक्षांकडे असलेल्या व्हेटो अधिकारामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला आपली सर्व धोरणे सहजपणे राबविता येतीलच असे नाही. परंतु अमेरिकेत सत्ताधारी अध्यक्ष आणि विरोधी पक्षाच्या नियंत्रणाखालील संसद यांच्यात संघर्ष वाढू शकतो. अशा संघर्षाचा परिणाम केवळ अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणावर होणार नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरही होऊ शकतो. मध्यावधी निवडणुकीतील पराभवामुळे ट्रम्प यांची अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात येणार नाही. परंतु, उर्वरित कार्यकाळात त्यांना आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागेल. विरोधकांना केवळ राजकीय शत्रू समजून चालणार नाही, तर त्यांच्या प्रश्नांनाही उत्तर द्यावे लागेल. आर्थिक आघाडीवरील असंतोष दूर करणे, आंतरराष्ट्रीय संघर्षांचे परिणाम मर्यादित ठेवणे आणि प्रशासनाच्या कारभारात संतुलन राखणे, ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.