संस्कृती, विचार व विकास हा लोकशाहीचा पाया- संदीप शेळके
बुलढाणा (Sandeep Shelke) : संस्कृती, विचार आणि विकास या त्रिसूत्रीवरच ही निवडणूक लढवली जात आहे. हाच लोकशाहीचा पाया असून महाविकास आघाडीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. बुलढाणा मतदार संघात ‘मशाल’ घराघरात पोचली असून सुज्ञ मतदार लोकशाही विचारांना बळ देणार आहे. त्यामुळे विजय हमखास असल्याचे शिवसेनेचे नेते संदीप शेळके (Sandeep Shelke) म्हणाले.
चैतन्यवाडी परिसरात प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार जयश्रीताईंच्या प्रचारासाठी संदीप (Sandeep Shelke) व मालतीताई यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मित्रपरिवार तथा कार्यकर्त्यांसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. सामान्य परिस्थितीतून येऊन शेळके परिवाराने आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले नावलौकिक केला आहे. जयश्रीताई सुनील शेळके (Jayshree Shelke) विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यात. त्यांच्यासाठी त्यांचे दीर संदीप शेळके पूर्ण ताकतीने झोकून देऊन प्रचारात उतरल्याचे चित्र आज दिसून आले. निवडणुकीमुळे मने दुरावतात, जवळचे दूर जातात. मात्र बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई शेळके यांची उमेदवारी शेळके परिवाराला जवळ आणणारी ठरली. संदीप शेळके (Sandeep Shelke) यांच्या लोकसभेत जाण्याच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही. दरम्यान, मधल्या काळात दोघांच्या मध्ये राजकीय पक्षांच्या भिंती आल्या होत्या. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मनोमिलन परिवारासाठी आनंदाची पर्वणी ठरले. शेळके परिवार एकजुटीने प्रचारासाठी उतरल्याचे देखील दिसून येत आहे. संदीप शेळके यांची संपूर्ण टीम, कार्यकर्ते झोकून देऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला भिडल्याने मशाल आणखीच बळकट झाली आहे.
रविवार १० नोव्हेंबरला विष्णुवाडी, शाहू नगर, चैतन्यवाडी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांनी संवाद साधला. जनतेच्या पायाभूत सुविधांसाठी, सर्वांगीण विकासासाठी उद्धव ठाकरे यांनी हाती दिलेली मशाल हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा संघटक प्रा.डी.एस.लहाने, तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, कमलताई बुधवत, उज्वलाताई काळवाघे, दामोदर बिडवे, डॉ.पुरुषोत्तम देवकर, राजू काटीकर, नंदिनी टारपे, मालतीताई शेळके यांच्यासह समस्त महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.