मराठा योद्धांची हिंगोलीत पत्रकार परिषदेत माहिती
हिंगोली (Manoj Jarange) : विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील हे उमेदवार उभे करणार होते; परंतु समाजातील दुही टाळण्याकरीता त्यांनी कोणत्याही ठिकाणी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व मराठा योद्धांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे असे आवाहन केले होते. बहुतांशी जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले; परंतु बोटावर मोजण्या इतक्या काही इच्छुकांनी निवडणूक अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे कोणालाही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा पाठिंबा नसल्याची माहिती हिंगोलीत मराठा योद्धांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत बालाजी वानखेडे, विनायकराव भिसे पाटील, पप्पू चव्हाण, मनोज आखरे, कल्याण देशमुख, माधव कोरडे, कृष्णा पवार, प्रभाकर भिसडे, ईसापूर रमना येथील सरपंच ज्ञानेश्वर जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना वानखेडे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाकरीता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सुरू केलेला लढा निवडणुकीनंतरही पुढे चालू राहणार आहे. निवडणुकीनंतर सार्वजनिक उपोषण केले जाणार आहे.
जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समोर मुलाखती देऊन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक न लढविण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. बहुतांशी इच्छुकांनी माघार घेतली. काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही त्यांनी येत्या दोन दिवसात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा आदेश पाळावा असे आवाहन देखील त्यांनी केले.