लढायचं तर कमळ चिन्हावरच लढा!
उदगीर (Sanjay Bansode) : भाजपाचे उदगीरचे ‘केंद्र’ असलेल्या एका नेत्याने म्हणे चक्क क्रीडामंत्र्यांनाच भाजपाकडून लढण्यासाठी साकडे घातले आहे. असे वातावरण निर्माण होण्याची वाट दस्तूरखुद्द मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) पाहत असल्याची चर्चा आहे. भाजपानेच राज्यभरात हा प्रयोग राबविण्यासाठी चाचपणी चालविल्याची चर्चा सुरू झाल्याने अजितदादांचे शिलेदार कमळाबाईवर फिदा होतात की काय? असा सवाल केला जात आहे.
परवा लातूरमध्ये आमदार पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपाच्या कोअर कमिटीने उदगीर व अहमदपूर या दोन्ही जागांसह जिल्हाभरातील सर्वच जागा भाजपाने लढवाव्यात, अशी हाकाटी दिल्याने म्हणे आता हा पहिला गळ क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना घातला आहे. विशेष म्हणजे असा कुणीतरी आपणाला गळ घालावा, यासाठी दस्तूर खुद्द क्रीडामंत्री बनसोडेही गळ टाकून बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
लोकसभेला लातूरची जागा गमवावी लागल्यानंतर विधानसभेसाठी भाजपाने पुन्हा एकदा नव्या दमाने तयारी चालवली आहे. भाजपाचे सर्वेसर्वा असलेले (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता मराठवाड्यातील भाजपाची सूत्रे आमदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे गेल्याचे कालच्या बैठकीतून स्पष्ट झाली आहे. या बैठकीला लातूर जिल्ह्यातील तीन आमदारांसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाने विधानसभा लढविताना जिल्ह्यातील सर्वच जागा लढवाव्यात, असा ठराव या बैठकीत झाल्याची चर्चा आहे. असे झाले तर लातूर जिल्ह्यातून महायुतीतील घटक पक्ष असलेली अजितदादांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा सुपडा साफ होणार, हे जवळपास निश्चित आहे.
उदगीरसह अहमदपूरची जागा भाजपाने कमळावर लढवावी असा ठराव घेतला गेल्याची चर्चा आहे. आता परवा म्हणजे ३ तारखेला उदगीरमध्ये भाजपाच्या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक होणार आहे. त्यात पुढील रणनीती आखली जाणार आहे. केंद्रे पिता-पुत्राचा बनसोडेंशी लळा असून बनसोडेंनी कमळावर निवडणूक लढवावी, यासाठी ते आग्रही असल्याची चर्चा आहे. तूर्तास, क्रीडामंत्री बनसोडे स्वतः भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी परिस्थिती तयार व्हावी, याची वाट पाहत बसल्याची चर्चा आहे. काहीही झाले तरी बनसोडे कोणत्याही चिन्हावर लढले तरी त्यांचे कारभारी (कार्यकर्ते) तेच राहणार असल्याने भागातील ग्रामीण भाजपा नेते आता बंडाच्या पवित्र्यात आहेत.
म्हणे राष्ट्रवादीची आॕफर…
काहीजण नवखा उमेदवार असावा यासाठी आग्रही आहेत. आता शाळेचे दफ्तर घेऊन ‘पाॕलिटिकल मार्केट’मध्ये उतरलेला नवखा असला तरी केवळ दफ्तराच्या पिशवीवर निवडणूक जिंकता येते का? असा सवाल केला जात असल्याने भाजपाने तिकिट दिले तर ठीक नाहीतर आपल्याला राष्ट्रवादीची ‘आॕफर’ आहे, अशी हाकाटी एका माजी खासदाराने कार्यकर्त्यांच्या कानी पिटल्याचीही चर्चा आहे. मात्र ती कोणत्या राष्ट्रवादीची? हे त्यांनी म्हणे गुलदस्त्यात ठेवले आहे.