पुसद (Sanjay Deshmukh) : यंदा झालेली लोकसभेची निवडणूक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच हाती घेतली होती.लोकप्रतिनिधींनी काम न केल्यास त्यांना जाब विचारणे हा मतदारांचा हक्क आहे. मला निवडून आणण्यासाठी समाजबांधवांसह मतदारांनी निवडणूक हातात घेऊन प्रचार केला. त्यामुळे मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांच्या समस्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत मांडून ते प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित खा. संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी पुसद अर्बन कॉपरेटिव बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यक्त केले. ते आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड.आशिष देशमुख होते.
मराठा समाज व पुसद अर्बन बँके तर्फे सत्कार संपन्न
प्रमुख अतिथी म्हणून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, माजी जिप उपाध्यक्ष राम अनंतराव देवसरकर, अमरावती विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिगंबर जगताप,डॉ. मोहम्मद नदिम,एड रमेश पाटील, सुधीर देशमुख, संभाजी टेटर, शिवसेना उमरखेड विधानसभा संघटक रंगराव काळे,पंजाबराव देशमुख खडकेकर,अशोक बाबर,राजेश सोळंके,नितिन पवार,शिवाजी कदम, शुभांगी पानपट्टे, डॉ. आशा कदम, तालुकाध्यक्ष मंदा इंगोले ,उज्वला खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.कु स्वरा राजेश भाकरे हिने जिजाऊ वंदना सादर केली.
सकल मराठा समाजाच्या वतीने शरद मैंद,शिवाजी कदम,दिलीप पाटील कान्हेकर,संभाजी टेटर,किरण देशमुख सवनेकर,बंडू पारटकर,यशवंत देशमुख इत्यादींनी नवनिर्वाचित खा. संजय देशमुख यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्याचबरोबर पुसद अर्बन बॅंक व संचालक मंडळ,संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या तर्फे ही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.आशिष देशमुख यांनी केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असतांना देखिल मराठा समाजाला कायद्यात टिकणारे ओबीसीतून आरक्षण दिले नसल्याने मराठा समाजाने एकजूट दाखवून शक्तीचे प्रदर्शन केले असून आरक्षणाला राजकीय स्वरुप येऊ देऊ नका,गैरसमज पसरवणार्यांपासून सावध राहा,एकजूट कायम ठेवा असे उपस्थित समाजबांधवांना आवाहन करुन खा. देशमुख (Sanjay Deshmukh) हे आपल्या सह सर्व समाजाच्या समस्या सोडवतील असा आशावाद व्यक्त केला.प्रास्ताविक शरद मैंद यांनी केले ते म्हणाले,जरांगे पाटलांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राला नवी तर देशाला मराठा समाजाची ताकद काय असते हे दाखवून दिले.
जरांगे व डिएमके फॅक्टरचा फायदा झाल्याने त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहेत असे सांगून पुसद येथे मराठा समाजासाठी सुरु असलेल्या समाजभवनासाठी दोन कोटींच्या कामात आणखी दोन कोटींची भर टाकावी तसेच मराठा समाजासाठीचे वसतिगृह व स्टडी सर्कलच्या कामासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन खा संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना केले.राम देवसरकर यांनी मराठा कुणबी समाजाचे पुसद व यवतमाळ येथील रखडलेल्या वसतिगृहाचे व समाजभवनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठीचे नेतृत्व खा. संजय देशमुख यांनी करावे अशी मागणी केली.यावेळी जरांगे पाटील (Jarange Patil) समर्थक शिवाजी कदम यांनी मराठा समाजाला कुठल्याही समाजाचे आरक्षण हिरावून न घेता जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची भूमिका विषद करुन संजय देशमुखांना निवडून आणण्यासाठी पुसद विधानसभा मतदार संघात गावोगावी कशाप्रकारे प्रचार केला ते विषद केले.यावेळी दिगंबर जगताप यांनी समायोचित भाषण केले. सूत्रसंचालन चंद्रकांत ठेंगे यांनी केले.उपस्थितांचे आभार नितिन पवार यांनी मानले. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व मराठा समाज बांधव उपस्थित होते.