माध्यमांनी खातरजमा करूनच बातमी द्यावी – माजी मंत्री राठोड
मानोरा (Sanjay Rathore) : कोणताही राजकीय वारसा नसतांना शेतकरी कुटुंबातून जन्मास येवून शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून समजकरणातून राजकारणात प्रवेश केला. सन १९९३ पासून शिवसेनेत रात्रंदिवस काम करत शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख आणि नंतर आमदार व त्यानंतर राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री पर्यंत प्रवास केला आहे. सन २००४ पासून पाच वेळा दिग्रस – दारव्हा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रत्येक वेळी माझे मताधिक्य वाढले आहे. नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत १ लाख ४४ हजार मते मिळाली आहे.
माझ्या कार्यकाळात महसूल, वन, अन्न व औषध प्रशासन तसेच जलसंधारण मंत्री म्हणून महत्त्वाचे निर्णय घेत राज्यात विकासात्मक कामे केली आहेत. यवतमाळ व वाशीम जिल्हयाचा पालकमंत्री असताना दोन्ही जिल्हयासाठी सातत्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडून मोठा निधी खेचून आणला आहे. तरी पण माझा मंत्रिमंडळात समावेश होवू नये, यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचत नापास अशी बदनामी पसरविण्याचा सपाटा चालविला आहे. त्यामुळे माध्यमांनी खातरजमा करूनच बातमी द्यावी, असे भावनिक आवाहन माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीना केले आहे.
प्रसार माध्यमामध्ये माझ्या विरोधात प्रगती पुस्तकात नापास, मंत्रिमंडळातून पत्ता कट, आणि मंत्री मंडळातून डच्चू अश्या आशयाच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. यावर भाष्य करताना आमदार संजय राठोड म्हणाले की, हा प्रकार आपल्या जिव्हारी लागला असुन मनाला प्रचंड वेदना होतात. बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथे ७०० कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आणून विकास कामे मार्गी लावली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंजारा विरासत या भव्य नंगरा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्याला नुकतेच येवून गेले. त्यावेळी त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले.
गेल्या अडीच वर्षात मी पालकमंत्री राहिलेल्या यवतमाळ व वाशीम जिल्हयात पंतप्रधान दोन वेळा येवून गेलेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे यवतमाळ जिल्हयात पाच वेळा विविध कार्यक्रमासाठी आलेत. माझे प्रगती पुस्तक नापास असते तर त्यांनी मला भरभरुन विकास कामासाठी निधी दिला नसता, माझे काम लोकाभिमुख नसते तर जनतेने मला, पाच वेळा निवडून दिले नसते. असा प्रश्न माहिती देताना माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी उपस्थित केला आहे.
माझ्या विरोधात २०२१ मध्ये आरोप झाले होते, तेंव्हा स्वतःहून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या चौकशीत मला क्लीन चिट मिळाली. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश झाला. माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. मी माझ्या राजकीय कारकीर्दीत प्रामाणिकपणे जनतेसाठी काम केले आहे. त्यामुळे नापास हा शब्द माझ्यासाठी अस्विकार्य आहे. विरोधकांनी माध्यमांना हाताशी धरून माझ्या विरोधात षडयंत्र रचले आहे. असे ते (Sanjay Rathore) म्हणाले.