नांदगाव पेठ (Kavadyatra with Yashomati Thakur) : श्रावण मासाचे औचित्य साधून भोलेनाथ क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या कावड यात्रेने संतनगरी नांदगाव पेठ भक्तीमय झाले होते. संगमेश्वर मंदिर येथून जल घेऊन ही कावड यात्रा (Kavadyatra) प्रारंभ झाली आणि भोलेनाथ चौक येथील मंदिरात जलार्पण करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भोलेनाथांच्या प्रतिमेसमोर आ. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भक्तांमध्ये उत्साह संचारला होता.
श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाव्दारे जल अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी (Kavadyatra) वेगवेगळ्या तिर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदीरात जलाभिषेक करीत असतात. सोमवारी नांदगाव पेठ येथे मोठ्या जल्लोषात शिवभक्तांनी कावड यात्रेचे आयोजन करत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या कावडने संगमेश्वर नदीतील जलाचा जलाभिषेक शासकीय वसाहत स्थित महादेव मंदिरात केला. संस्थेचे अध्यक्ष पंकज शेंडे व उपाध्यक्ष अमित यादव यांच्या उत्कृष्ट नियोजनातून विविध धार्मिक देखावे सादर करत गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
हरहर महादेव च्या गजरात संगमेश्वर देवस्थान येथून ही कावड यात्रा जल घेऊन संगमेश्वर नगर, यावलपुरा,बारीपुरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचली.हजारो भक्तांच्या उपस्थितीत आ. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर माळीपूरा मार्गाने ही कावडयात्रा (Kavadyatra) बस स्टॅण्ड येथून शासकीय वसाहत स्थित महादेव मंदिरात पोहचली व संगमेश्वर येथून आणलेले जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून कावडयात्रेचा समारोप करण्यात आला. दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी शेकडो गावकरी नागरिक, भक्त मंडळी या कावडयात्रेत सहभागी झाले होते.