विभागीय आयुक्तांनी दिले आदेश
नांदगाव पेठ (Sarpanch Preeti Bundile) : कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप असलेल्या माहुली जहागीर येथील महिला सरपंच प्रीती मनोज बुंदीले (Sarpanch Preeti Bundile) यांना सरपंच तथा सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. माहुली जहागीर येथील माजी सरपंच व भाजपा कार्यकर्ते सुधीर बीजवे यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवर नुकताच विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिला. प्रीती बुंदीले यांच्यावर गैरवर्तन व लज्जास्पद वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुधीर बीजवे यांनी केली होती तक्रार
१५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत माहुली जहागीर येथे पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनचे कंत्राटदार रामबाबू गणेशराव मोंढे यांनी कामे पूर्ण केल्यानंतर त्या कामाचे कमिशन म्हणून सरपंच पती मनोज बुंदीले यांनी कंत्राटदार मोंढे यांना पाच हजार रुपये मागितले होते. त्यामुळे मोंढे यांनी २६ सप्टेंबर २३ रोजी मनोज बुंदीले यांना चार हजार रुपयांची लाच देतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. (Sarpanch Preeti Bundile) सरपंच प्रीती बुंदीले या मात्र फरार होत्या.न्यायालयाने त्यांना निवडक अटी व शर्थीवर अग्रीम जमानत दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा त्या पदावर कायम असल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम (३९) १ नुसार सुधीर बीजवे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते.
७ ऑगस्ट २०२४ रोजी विभागीय आयुक्त यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत अर्जदार सुधीर बीजवे यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर सरपंच प्रीती बुंदीले या सरपंच पदावर व सदस्य पदावरून अपात्र करण्यात आल्याचा निर्णय देऊन सुधीर बीजवे यांचे प्रकरण निकाली काढण्यात आले. प्रीती बुंदीले यांच्या नावाने त्यांचे यजमान मनोज बुंदीले (Sarpanch Preeti Bundile) यांनी लाच घेतली होती. कमिशन साठी हपापलेल्या या दाम्पत्याने पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत मध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला असे अनेक आरोप त्यांच्यावर होत आहे.
न्याय मिळाला
सरपंच प्रीती बुंदीले या भ्रष्ट आणि लाचखोर असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्या सरपंच पदाची धुरा सांभाळणे हे त्या पदाचा अवमान करणारे होते. त्यामुळे मी याप्रकरणी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी निष्पक्ष चौकशी करून प्रीती बुंदीले (Sarpanch Preeti Bundile) यांना अपात्र घोषित केले आणि खऱ्या अर्थाने याप्रकरणी मला न्याय मिळाला.
– सुधीर बीजवे (अर्जदार), माजी सरपंच व भाजपा कार्यकर्ते, माहुली जहागीर