परभणीच्या गमगाखेड येथील अपात्र निराधार लाभार्थ्यांचा सहभाग
परभणी/गंगाखेड (Satyagriha Andolan) : संजय गांधी निराधार योजना, इंदिरा वृद्धापकाळ योजनेसह श्रावण बाळ योजनेतील निराधार लाभार्थ्यांकरिता लावलेल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी अपात्र लाभार्थ्यांनी सोमवार २३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर सत्यागृह (धरणे) आंदोलन (Satyagriha Andolan) करून निवेदन सादर केले आहे.
शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा वृद्धापकाळ योजनेसह श्रावण बाळ योजनेतील अपंग, विधवा, परितक्त्या, निराधार लाभार्थ्यांकरिता लावलेल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी अपात्र ठरलेल्या असंख्य लाभार्थ्यांनी सोमवार २३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर सत्यागृह (धरणे) आंदोलन करत तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या कक्षात ठिय्या मांडून निवेदन सादर केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणाऱ्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसह कँसरग्रस्त लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करून गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जाचक अटी रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असुन आगामी २६ डिसेंबर रोजीपर्यंत सत्यागृह (धरणे) आंदोलन (Satyagriha Andolan) करून २७ डिसेंबर रोजीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी असंख्य अपात्र लाभार्थ्यांसह शेकापचे भाई गोपीनाथ भोसले, कॉ. योगेश फड, निलाकांत जाधव, मारोतराव भिसे आदी उपस्थित होते.