एसआयटी चौकशीची केली मागणी : अनेक संस्थांचे फुटणार ‘बिंग’!
लातूर (School ID Scam) : राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा व या घोटाळ्यात छत्रपती संभाजी नगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली असतानाच शिक्षण पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लातूरमध्येही शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी 30 दिवसांच्या आत एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. लातूरमध्ये या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली तर अनेक शिक्षण संस्थांचे (Educational Institutions) भिंग फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागात ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’, अशी परिस्थिती!
लातूर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमिक शिक्षण विभागात (Department of Education) गेल्या काही वर्षांपासून ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याला शासकीय नोकरीत कुठेही स्थान नाही, अशी रिकामटेकडी मंडळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात खुर्च्यांमध्ये बसून शिक्षण विभागाचा कारभार हाकत आहेत. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी (Education Officer, Secondary Department) मात्र याकडे साफ डोळेझाक करीत आहेत. अशाच कारभारातून माध्यमिक शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळा पुढे आला आहे.
प्रकरणात शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान!
लातूरच्या इंडिया नगरातील अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयात (Ahilyadevi Secondary School) पाच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती (Bogus Recruitment), ‘बोगस शालार्थ आयडी’द्वारे झाल्याचा आरोप तक्रारदार तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल महापुराव भोसले यांनी केला आहे. भोसले यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे 22 महिन्यांपूर्वी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना तसेच राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना (Director of Education) अधिकृतपणे दिले आहेत. तसेच या प्रकरणात शासनाचे (Government) कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, हे भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणांची तात्काळ दखल घ्यावी व एसआयटीच्या माध्यमातून चौकशीचे आदेश (Order of Inquiry) द्यावेत, अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
शरद बाळासाहेब पाटील सहशिक्षक, श्रीमती शामल राम गायकवाड सेवक व हनुमंत व्यंकटराव तांदळे कनिष्ठ लिपिक यांच्यासह आणखी दोन सेवक यांचे शालार्थ आयडी (School ID) बनावट असल्याची तक्रार भोसले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात 30 दिवसात एसआयटी मार्फत चौकशी करावी; अन्यथा 26 जूनपासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सत्याग्रह करू, असे भोसले यांनी या पत्रात म्हटले आहे.
उपसंचालकांची डोळेझाक!
माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून (Office of Secondary Education Officer) शालार्थ आयडी साठी एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यास मान्यता देण्याचे काम उपसंचालकांचे असतेच; मात्र ही मान्यता देताना संबंधित प्रस्तावातील कागदपत्रांची शहानिशा न करता उपसंचालकांनी अशा शालार्थ आयडीसाठी मान्यता देत सपशेल डोळेझाक केल्याचा हा प्रकार आहे. यासाठी उपसंचालकांनाही जबाबदार धरणे आवश्यक आहे.
– विठ्ठल महापुराव भोसले, तक्रारकर्ते