जळकोट(Latur) :- जळकोट (जि. लातूर) तालुक्यातल्या माळहिप्परगा येथे आज 17 सप्टेंबर रोजी अत्यंत दुःखद घटना घडली. अल्पभूधारक शेतकरी बैल धुण्यासाठी तलावात गेले असता बैलाने धुडगूस केल्याने शेतकरी खोल पाण्यात गेला, बाप बुडत असल्याचे पाहून तलावाच्या कडेवर असलेल्या 12 वर्षाच्या मुलाने बापाला वाचवण्यासाठी तलावात (Lake) उडी घेतली. परंतु बापाला व मुलाला पोहता येत नसल्यामुळे बापलेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला.
बैल धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू
माळहिप्परगा येथील शेतकरी त्रिपती बाबुराव पवार (वय ४२ वर्षे) व मुलगा नामदेव त्रिपती पवार (वय १२ वर्षे) हे दोघेही बैल धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावात गेले होते. बैल धुवून बाहेर निघत असता पाण्यामध्ये बैल जोडी खोल असलेल्या ठिकाणी जात होती. मुलगा नामदेव हा बैलाला बाजूला घेण्यासाठी जात असता पाण्याची खोली जास्त असल्याने पाण्यात गुचक्या खात होता. वडील त्रिपती हे मुलाला बाहेर काढण्यासाठी गेले असता मुलगा वडिलाच्या गळाला पडला. त्यामुळे दोघेही गाळात अडकून बसले. शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी आरडाओरड केल्याने नागरिक जमले. नागरिकांनी तलावात उतरून दोघा वडील व मुलाला बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. जळकोट येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले. वडील व मुलावर माळहिप्परगा येथे एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेमुळे माळहिप्परगा गावात शोककळा पसरली आहे.